ब्रिटनचे राजा म्हणून चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक सोहळा नुकताच पार पडला. जगावर साम्राज्य स्थापित करणाऱ्या ब्रिटनच्या राजघराण्याला आता जबर विरोधाला सामोरे जावे लागत आहे. माझा राजा नव्हे अशी ब्रिटनच्या राजाची हेटाळणी करणारी चळवळ राज्याभिषेकाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. ब्रिटिश साम्राज्यात अजूनही कॅनडा, ऑस्ट्रेलियासहीत 15 राष्ट्रांचे प्रमुख ब्रिटनच्या राजाला मान्यता आहे. नवीन राजा चार्ल्स यांना ब्रिटनसहीत राष्ट्रकूल देशांच्या समुहात विरोधाला सुरुवात झालेली आहे.
माझा राजा नव्हे अशी आगळीवेगळी आणि ब्रिटिश राजघराण्याला नाकारणारी चळवळ उदयाला आली. ब्रिटनच्या राणी एलिझाबेत द्वितीय यांचा गेल्यावर्षी सप्टेंबर 2022 मध्ये मृत्यू झाल्यानंतर राजगादीचे वारस म्हणून युवराज चार्ल्स यांना राजा म्हणून सन्मान मिळणार होता. त्यावर गेल्या आठवड्यात 6 मे रोजी झालेल्या राज्याभिषेक सोहळ्यात शिक्कामोर्तब झाले. दीर्घकाळ ब्रिटनची राणी म्हणून एलिझाबेत द्वितीय यांनी राजकारभार हाकला. त्यांच्या निधनानंतर जवळपास सात महिने ब्रिटनची गादी खाली होती. युवराज चार्ल्स यांना राजा म्हणून अधिकार सूत्रे सोपविण्यास विविध कारणांमुळे विलंब होत गेला. अनेक कारणांपैकी एक म्हणजे ब्रिटन आणि राष्ट्रकूल समुहात राजा म्हणून चार्ल्स तृतीय याला असलेला विरोध महत्त्वाचे कारण होते.
ब्रिटनमध्ये सध्या महागाईने सर्वसामान्यांचे जीवन बेचैन केलेले आहे. अशा या परिस्थितीत ब्रिटनच्या राजघराण्याला चैन करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घामाकष्टाचा पैसा का उधळायचा, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आयजीच्या जीवावर बायजी उदार, अशी स्थिती ब्रिटनवासीयांची झालेली आहे. ब्रिटनच्या राजगादीचा वारसदार असलेल्या चार्ल्स तृतीयला ब्रिटनमध्ये जबरदस्त विरोध होऊ लागला. राजा हवा की नको यासाठी ब्रिटनसहीत कॅनडा, ऑस्ट्रेलिया व अन्य राष्ट्रकूल समुहातील देशांत यासंबंधीच्या प्रश्नांवर सर्वे होऊ लागले. यात युवावर्ग ब्रिटन राजघराण्याविरोधात असल्याचे दिसून आले. राजघराण्याच्या उधळपट्टीवर सर्वांनी बोट ठेवले. तसेच राजा किंवा राणी आणि राजघराण्यातील सदस्यांनी असलेल्या सवलती, देशातील कायद्यांपासून असलेली मुक्ती, याबद्दल तरुणाईत चीड दिसून आली. यासाठीच माझा राजा नव्हे, या चळवळीचा जन्म झाला.
ब्रिटनची दिवंगत राणी एलिझाबेत यांना देशातील 160 कायदे लागू नव्हते. यात त्यांना देशांत कुठेही फिरण्याची मुभा होती. देशातील सर्वप्रकारच्या
करप्रणालीतून त्यांना आणि त्यांच्या सदस्यांना वगळण्यात आलेले आहे. त्यांच्या महसूलाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती ठेवण्याचा वा मागविण्याचा अधिकार
ब्रिटनमधील सरकारला नाही. या सर्व प्रकारांचा उबग ब्रिटनच्या जनतेला आलेला असून त्याचे विरोधात प्रकटीकरण आता होऊ लागले आहे. तरुणाईत जरी विरोधाची भाषा जाणवत असली तरी पन्नाशी उलटलेला ब्रिटिश नागरीक आजही ब्रिटनच्या राजघराण्याची पाठराखण करीत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. बीबीसीने केलेल्या सर्वेक्षणात सर्वच वयोगटातील लोकांच्या मतानुसार 58 टक्के लोकांना राजाचे स्थान मान्य आहे. अर्थात तरुण पिढीला ब्रिटिश राजेशाही गरजेची नसल्याचे मत व्यक्त केलेले आहे.
ब्रिटनच्या राजघराण्याला एक हजार वर्षांचा इतिहास असून तो अत्यंत हिंसक आणि क्रुरतेची परिसीमा गाठणारा असा आहे. राजा विलियम यांच्यापासून 1066 ब्रिटिश राजघराण्याची सुरुवात झाली. सात हजारांचे सैन्य घेऊन आलेल्या विलियमने इंग्लंडमधील प्रस्थापित राजवट मोडून नोमेडिक राजघराण्याची स्थापना केली. या राजघराण्याच्या आतापर्यंत 34 पिढ्या झालेल्या आहेत. मात्र या घराण्याचा इतिहास काळाकुट्ट असा असून आपल्याच परिवारातील भाऊ, पुतण्या आणि बायकांचा क्रूर पद्धतीने नरसंहार करण्याची परंपरा राखली. त्यातील विलियम द्वितीय यांनी क्रूरतेची हीन पातळी गाठली होती. राजा जॉन यांनी 1199 साली ब्रिटनच्या राजाची धूरा हाती घेतली. त्याने आपल्या 16 वर्षिय पुतण्याचे डोळे काढण्याचे आदेश दिले होते. मात्र या क्रूर शिक्षेची अंमलबजावणी करण्यास जेलरने मनाई केली असता खुद्द राजानेच आपल्या पुतण्याचा शिरच्छेद करून नदीत फेकून दिले होते. पुढे राजघराण्यातील दोन गटांत सलग तीस वर्षे गृहयुद्ध सुरु होते. त्यात दोन हजार सैनिकांची हत्या करण्यात आली. या राजघराण्यातील एक राजा एडवर्ड चौथे यांनी आपल्या अल्पवयीन भावाला वाईनच्या टाकीत बुडवून ठार मारले
होते.
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश राजघराण्याची सत्ता जाऊन इंग्लंडमध्ये प्रजासत्ता शासन प्रणाली सुरु झाली. पण काही वर्षांत चार्ल्स द्वितीय यांनी इंग्लंडची सत्ता पुन्हा एकदा काबिज केली. त्यांनी बरीच वर्षे सत्ता उपभोगली. त्याच्याच काळात ब्रिटनची राजसत्ता सातासमुद्रापार नेऊन वसाहती निर्माण केल्या. आफ्रिकेतील नागरिकांना गुलाम म्हणून वापरण्यास सुरुवात केली. तसेच ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राजसत्तेचे संरक्षण प्राप्त करून दिले. त्यानंतर विलियम नामक आणखीन एका ब्रिटिश राजाने अनेक विवाह केले आणि या ना त्या कारणावरून कित्येक बायकांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार
केले.
गेल्या आठवड्यात झालेल्या चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकानिमित्त त्यांच्या क्रूरकर्म्या पूर्वजांच्या इतिहासाला उजाळा मिळाला. अशावेळी भारतातील सेलेब्रिटी म्हणून गेलेल्या आणि राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी सोनम कपूर सारख्यांनी दोन शब्द बोलण्यापूर्वी या तथाकथित राजघराण्याचा काळाकुट्ट इतिहास अगोदर जाणून घेणे गरजेचे होते. आता इतिहासाला उजाळा मिळालेलाच असून सद्य परिस्थितीत राजघराण्याला असलेला 58 टक्क्यांचा पाठिंबा पुढील दहा वर्षांत आणखीन खालावणार आहे. तसेच राष्ट्रकुल समुहातील पंधरा देशांची होणारी ताटातूट विद्यमान राजा चार्ल्स रोखू शकणार नाही. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याचा हा शेवटचा राज्याभिषेक ठरला तर नवल वाटू नयेत.
प्रशांत कामत








