दुचाकी, तीन चाकी, चार चाकींचा समावेश : महिलांची संख्या 7 तर पुरुषांची संख्या 36 हजारांवर
बेळगाव : आरटीओचा कारभार ऑनलाईन झाला. परिणामी येथील सावळा गोंधळही कमी झाला. मात्र, अजूनही या ठिकाणी एजंटराजची चलती आहे. असे असले तरी ऑनलाईन व्यवहारामुळे अनेक जण घरबसल्या आरटीओ संबंधीची कामे करण्यावर भर देत आहेत. वाहन व सारथी अॅपमुळे अनेकांना आपली कामे करून घेणे सुलभ झाले आहे. त्यामुळेच मागील दीड वर्षांत 44 हजारांहून अधिक जणांनी वाहन परवाना काढून घेतला आहे. बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात बेळगाव व खानापूर तालुका येतो. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा भार बेळगाव कार्यालयावर पडतो. यामुळेच ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला गेला आहे. मागील दीड वर्षांत 44 हजार 350 जणांनी ऑनलाईन वाहन परवाना काढला आहे. यामध्ये 7 हजार 695 महिला तर 36 हजार 648 पुरुषांनी वाहन परवाना काढला आहे. त्यामुळे आरटीओच्या महसुलातही मोठी भर पडली आहे.
एजंटगिरीला काही प्रमाणात चाप
ऑनलाईन व्यवहार झाल्यामुळे येथील एजंटगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. अजूनही काही एजंट संबंधित अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करतात. बेळगाव व खानापूर तालुक्यात दर महिन्याला दोन ते अडीच हजार जण वाहन परवाना काढून घेतात. आता ही संख्या वाढविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, जुन्या वाहन परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षांपूर्वीपासूनचे वाहन परवाने कुचकामी ठरले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
प्रत्येकाने वाहन परवाना काढणे गरजेचे
आरटीओ कार्यालयाचा व्यवहार ऑनलाईन झाल्याने महसूलही अधिक जमा होत आहे. मागील वर्षी 100 टक्क्यांहून अधिक महसूल गोळा झाला होता. यावेळीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. परवान्यांतून मोठा महसूल गोळा करण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दर महिन्याला 400 हून अधिक महिला वाहन परवाना काढत आहेत. पुरुषांची संख्या 2 हजारांच्या आसपास आहे. ही संख्या कधी वाढते कधी कमी होते. असे असले तरी प्रत्येकाने परवाना काढणे गरजेचे आहे. अपघात झाल्यास वाहन परवाना व इतर कागदपत्रांमुळे विमा मिळतो. याचे महत्त्व नागरिकांनीही जाणून घेणे गरजेचे आहे.
वाहन परवान्याविषयी जनजागृती करणार
बेळगाव व खानापूर तालुक्यात वाहन परवान्याविषयी जनजागृती करण्यावर भर देणार आहे. यासाठी विविध उपक्रम राबविणार असून 18 वर्षांवरील सर्वांनीच वाहन परवाना काढून घ्यावा, जेणेकरून भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत. सध्या आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहन परवाने काढण्यात येत आहेत. ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार असली तरी सर्वांनी वाहन परवाना काढून घेण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत.
-आरटीओ नागेश मुंडास









