त्रिपुरात जगन्नाथ रथयात्रेदरम्यान दुर्घटना : 18 जण जखमी
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुराच्या उनाकोटि जिल्ह्dयात बुधवारी संध्याकाळी जगन्नाथ यात्रेतील रथाचा उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीशी स्पर्श झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 2 मुलांसमवेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 18 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
‘उल्टा रथयात्रा’ उत्सवादरम्यान कुमारघाट भागात ही दुर्घटना घडली आहे. भाविक लोखंडी रथाला खेचत असताना रथ उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या संपर्कात आला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्रिपुरामध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या एक आठवड्यानंतर उलटी रथयात्रा काढली जाते. यात भगवान जगन्नाथाचा रथ मागील बाजूने खेचला जातो.
उनाकोटि जिल्ह्यातील दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दुर्घटनेत अनेक भाविकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पीडित कुटुंबांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या संकटसमयी राज्य सरकार पीडितांसोबत असल्याचे मुख्यमंत्री साहा यांनी म्हटले आहे.









