हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना : अनेक जण जखमी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या हैदराबाद येथील रमंतापूर भागात सोमवारी जन्माष्टमी शोभायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. शोभायात्रेदरम्यान एका रथाचा वीजवाहिन्यांशी संपर्क झाल्यामुळे रथामध्ये विजेचा प्रवाह सुरू झाला आणि खळबळ उडाली. या दुर्घटनेत 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरवर्षी ही शोभायात्रा आयोजित करण्यात येत होती. यंदाही ही यात्रा अंतिम टप्प्यात असताना वीजवाहिन्या रथाला चिकटल्याने जीवितहानी घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक वाहने आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात पोहेचविण्यात आले. स्थानिक रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने गांधी रुग्णालयात नेण्यात येत असताना 5 जणांनी अखेरचा श्वास घेतल्याचे स्थानिक रहिवासी जगदीश यांनी सांगितले.
कृष्ण यादव (वय 24), श्रीकांत रे•ाr (वय 35), सुरेश यादव (वय 34), रुद्र विकास (वय 39) आणि राजेंद्र रे•ाr (वय 39) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेवर तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष महेश कुमार गौड आणि परिवहनमंत्री पूनम प्रभाकर यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची पूर्ण माहिती घेत जखमींच्या स्थितीचा आढावा घेतला तसेच त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
वीजवाहिन्यांचा रथाशी संपर्क झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उप्पल पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनी दिली. या प्रकरणी झालेल्या चौकशीत टीव्ही केबल कनेक्टर वीजवाहिन्यांना चिकटले आणि वाहिन्या थेट रथाच्या संपर्कात आल्याचे आढळून आले आहे. तेलंगणाचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी या दुर्घटनेप्रकरणी विस्तृत चौकशीचे आदेश दिले आहेत.









