कणबर्गी कुस्ती मैदान : चटकदार कुस्त्यांमुळे शौकिनात समाधान

उमेश मजूकर /बेळगाव
कणबर्गी येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटना आयोजित हनुमान जयंती निमित्त भव्य कुस्ती मैदानात महान भारत केसरी सिकंदर शेखने आंतरराष्ट्रीय पदक विजेता दिनेश गोलियाचा अवघ्या चौथ्या मिनिटाला दशरंग फिरवून धडक मारत अस्मान दाखवून उपस्थित 30 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. सायंकाळी 10.4 मिनिटांनी प्रमुख कुस्ती महान भारत केसरी सिकंदर शेख व आंतरराष्ट्रीय पदक विजेता दिनेश गोलिया (हरियाणा) ही कुस्ती माजी महापौर शिवाजी सुंठकर, एसएस फौंडेशनचे संचालक व माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी उद्योजक बसवराज येळ्ळूरकर, श्रीकांत देसाई, मि. इंडिया स्नील आपटेकर, केदारी सुंठकर, गणपत बन्नोशी, ऑलिंपिकपटू एम. आर. पाटील, कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील व जय हनुमान कुस्तीगीर संघटना कणबर्गीचे पदाधिकारी उपस्थित होते. कुस्ती सुरु झाल्यानंतर काही सेकंदातच एकेरी पट काढून दिनेश गोलियाने सिकंदरला खाली घेत एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. पण सिकंदर शेखने खालून डंकी मारुन त्यातून सुटका करुन घेतली. दुसऱ्या मिनिटाला सिकंदरने एकेरी पट काढून दिनेश गोलियाला खाली घेत एकचाक मारुन चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण दिनेश गोलिया याने मानेवरती फिरून त्यातून सुटका करुन घेतली. तिसऱ्या मिनिटाला दिनेश गोलियाने दुहेरी पट काढून सिकंदरला खाली घेतले. पण सिकंदरने खालून डंकी मारुन वरती येत गोलियावर कब्जा मिळवित घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून गोलियाने सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला गोलियाने दुहेरी पट काढून सिकंदरला खाली घेत घिश्श्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सावरत सिकंदरने खालून दशरंग फिरवून धडक मारीत दिनेश गोलियाला क्षणातच चीत करुन उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

महान भारत केसरी प्रवीण भोला व महाराष्ट्र केसरी पुण्याचा पृथ्वीराज पाटील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती केदारी सुंठकर, श्रीकांत देसाई, बसवराज येळ्ळूरकर, सुनील आपटेकर, प्रवीण कणबरकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला दुहेरी पट काढून पृथ्वीराजने प्रवीण भोलाला खाली घेत पायाला आकडी लावून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी प्रवीणने त्यातून सुटका करुन घेतली. सातव्या मिनिटाला दुहेरी पट काढून प्रवीणने पृथ्वीराजवर कब्जा मिळवित एकचाकवर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या पृथ्वीराजला फिरविणे कठीण गेले. अकराव्या मिनिटाला एकेरी पट काढून पृथ्वीराजने भोलाला खाली घेत मानेवर घुटणा ठेऊन फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सावधपणे सुटका करुन घेतली. वेळेअभावी कुस्ती गुणावरती निकाल करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पण दोघांनी गुण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पण शेवटी वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती इंदापूरचा भारत मदने व हरियाणाचा रोहिल ही कुस्ती परशराम बेडका, सुरेश अष्टगी व कुडची कुस्तीगीर संघटना यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला रोहिलने दोन्ही हाताचे हप्ते भरुन पायाला आकडी लावित चीत करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी भारतने सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला भारत मदनेने एकेरी पट काढून रोहिलला खाली घेत एकचाक मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण रोहिलने आपला सर्व बोजा मानेवरती घेत फिरत त्यातून सावरला. बाराव्या मिनिटाला भारत मदनेने दुहेरी पट काढून पुट्टी मारुन रोहिलला चीतपट करीत उपस्थितांची वाहव्वा मिळविली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती शिवानंद द•ाrने कमलजीत पंजाब यांच्यात झाली. या कुस्तीत शिवानंद द•ाrने एकेरी पट काढून झोळी बांधून फिरविताना कमलजीतला दुखापत झाली त्यामुळे शिवानंद द•ाrला विजयी घोषित करण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत सतीश पुजारी न आल्यामुळे रोहित कंग्राळीला विजयी घोषित करण्यात आले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवया पुजारीने दिनेश घोडगेचा घिस्स्यावर पराभव केला. सातव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व सुनील करवते (सांगली) ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली. वेळेअभावी बरोबरीत राहिली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत निखिल गणेशपूरने एकनाथ बेंद्रेचा घुटण्या डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत कामेश कोल्हापूरने सुभाष मुसळेचा एकचाक डावावरती पराभव केला. तर दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुशांत कंग्राळीने विनायक भास्करचा निकाल डावावर पराभव केला. त्याचप्रमाणे संकल्प कंग्राळीने विनोद कुंदरगीचा ढाकेवर, रोहण घेवडेने ओमकार पाटीलचा (राशिवडे) घिस्स्यावर, पंकज चापगावने आकाश अथणीचा एकचाकवर, पृथ्वीराज कंग्राळीने महादेव दऱ्यांन्नावरचा घिस्स्यावर, निरंजन येळ्ळूरने गणेश निट्टूरचा झोळीवर, प्रथमेश कंग्राळीने यशपाल राजस्थानचा झोळीवर, दर्शन कंग्राळीने प्रवीण निलजीवर एकचाकवर विजय मिळविला. त्याचप्रमाणे निखिल कंग्राळी, किसन कंग्राळी, ओम कंग्राळी, उत्कर्ष बोडकेनट्टी, संजू पुजारी, रोहण कडोली, शिवम मुतगा यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर नेत्रदीपक विजय मिळविला.
मेंढ्याच्या कुस्तीत महेश तिर्थकुंडेने सागर सांगलीचा मोळी बांधून चीतपट करीत मेंढ्याचे बक्षीस मिळविले. आकर्षक गदेच्या कुस्तीत किरण अष्टगीने (कलखांब) ओमकार (सांगली) चा पराभव करुन गदेचे बक्षीस पटकाविले. तर दुसऱ्या आकर्षक कुस्तीत पार्थ कंग्राळीने कुमार तळवारचा (स्पोर्ट्स हॉस्टेल) एकेरी पट काढून ढाकेवरती विजय मिळविला. पंच म्हणून एम. आर. पाटील, गणपत बन्नोशी, आर्मी प्रशिक्षक कृष्णा पाटील, कृष्णा पाटील (कणबर्गी), बाळाराम पाटील, विश्वनाथ पाटील, चेतन बुद्धन्नावर, हणमंत गुरव, पिराजी मुचंडीकर, गंगाराम बाळेकुंद्री, दुधाप्पा कलखांब, राजू कडोली, सिद्राय मुचंडीकर, प्रशांत कंग्राळी, शिवाजी बुद्धीहाळ, काशिनाथ पाटील, देवाप्पा कुरबर, सिद्राय सांबरेकर, बाबू कल्लेहोळ, फकीरा कंग्राळकर, शिवाजी कडोली, नवीन मुतके यांनी काम पाहिले. समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले. राजू आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हलगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.









