भाविकांतून तीव्र नाराजी, दुरुस्तीची मागणी
बेळगाव : वडगाव येथील मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 11 रोजी होत आहे. मात्र याच काळात या परिसरातील अनेक रस्त्यांवर चरी मारुन ठेवल्या आहेत. तसेच काही कामे अर्धवट आहेत. ती पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे यात्रा काळातच साऱ्यांना ही समस्या भेडसावणार आहे. यामुळे वडगाव परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वडगाव येथील जागृत देवस्थान श्री मंगाई देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरविली जाते. यात्रेला भाविकही मोठ्या संख्येने येतात. याच काळात या रस्त्यांवरील कामे अर्धवट ठेवली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अर्धवट कामांबरोबर नवीन कामांसाठी काही ठिकाणी चरी मारल्या आहेत. वझे गल्ली, कारभार गल्ली, बाजार गल्ली या परिसरात चरी मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे.
मनपाच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप
यात्रोत्सव काळामध्ये रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र याच काळात रस्त्यावर चरी मारल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. मंगळवारी यात्रा असूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.









