स्टेट बँकेतील 2.23 कोटीचे अफरातफर प्रकरण
प्रतिनिधी/ पणजी
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना संशयित राकेश कुमार यादव याने 2 कोटी 23 लाख 32 हजार 055 रुपयांची अफरातफर केली होती. या प्रकरणाचा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी योग्य तपास करून संशयित राकेश कुमार यादव याच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालय, पणजी- गोवा येथे आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणाबाबत 23 एप्रिल 2022 रोजी ज्ञानेश्वर एम. ठाकरे, क्षेत्रिय व्यवस्थापक (उत्तर गोवा), स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. येथील ट्रेझरी शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना संशयित राकेश कुमार यादव याने 8 मार्च 2018 ते 6 जून 2021 दरम्यान बँक खात्यात घोटाळा केल्यामुळे बँकेला 1 कोटी 89 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी सीआयडीने भादंसं कलम 409, 477-(ए) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 13 (1) (सी)r, 13 (2) अंतर्गत संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद करून तपासकामाला सुरुवात केली होती.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, संशयित राकेश कुमार यादवने कोषागार शाखेच्या बीजीएल खात्यातून त्याच्या वैयक्तिक कर्ज खात्यामध्येही रक्कम हस्तांतरित केली होती. आपल्या अधिकृतपदाचा गैरवापर करून खात्यामध्ये घोटाळा करून एसबीआय ट्रेझरी बँक खात्यातून एकूण 2 कोटी 23 लाख 32 हजार 55 ऊपये रक्कम पळवली असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित राकेश कुमार याने लोकसेवक म्हणून गुन्हेगारी गैरवर्तणूक करून सदर रकमेचा (सार्वजनिक पैसा) स्वत:च्या वापरासाठी गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाचा तपास अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निनाद देऊलकर यांनी केला असून आरोपपत्र दाखल केले आहे.








