श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील प्रदेश अन्वेषण प्राधिकरणाने पाकिस्तानात शिकणाऱया एका भारतीय विद्यार्थ्यासह 3 जणांवर दहशतवादी कारवाया आणि हेरगिरीच्या कारणास्तव आरोपपत्र सादर केले आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. पाकिस्तानला भारताच्या सेनेच्या हालचाली आणि सेना केंद्रांची गुप्त माहिती पुरविल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. असीफ शबीर नाईक, शबीर हुसेन नाईक आणि सफदर हुसेन अशी आरोपींची नावे आहेत.
काश्मीर मधील विद्यार्थ्यांना पाकिस्ताने उच्च शिक्षणासाठी आपले दरवाजे उघडले आहेत. तथापि, या विद्यार्थ्यांना तेथे धार्मिक कट्टरतेचे शिक्षण दिले जाते. नंतर त्यांचा उपयोग काश्मीरमधील दहशतवादासाठी केला जातो. हे पाकिस्तानचे कारस्थान या आरोपपत्रामुळे उघड झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने जाणाऱया विद्यार्थ्यांवर सरकार बारकाईने लक्ष ठेवत आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये दहशतवादाचे शिक्षण घेऊन आलेल्या अशा 17 विद्यार्थ्यांना सीमेवर ठार करण्यात आले आहे. ते गुप्तपणे भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. यापैकी काही विद्यार्थी भारतात आल्यानंतर सैनिकांशी झालेल्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. पाकिस्तानात शिकण्यासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांना कट्टरवादाचा धोका समजावून सांगण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.









