वृत्तसंस्था/नवी दिल्ली
प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात शिकोहपूर भूमी घोटाळा प्रकरणी आरोपपत्र सादर केले आहे. हे प्रकरण 2018 मधील आहे. त्या वर्षी वाड्रा यांच्या विरोधात या प्रकरणात एफआयआर सादर करण्यात आला होता. त्यांच्यासमवेत हरियाणाचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंग हुडा, विख्यात मालमत्ता विकासक कंपनी डीएलएल आणि एक मालमत्ता दलाल यांच्या विरोधातही एफआयआर सादर करण्यात आला होता. वाड्रा यांनी अत्यंत कमी किमतीला मोठे भूखंड विकत घेऊन ते बऱ्याच अधिक किमतीला बेकायदेशीररित्या विकले, असा आरोप या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयात चालणार आहे. वाड्रा यांच्यावर आरोपपत्रात, भ्रष्टाचार, बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक करणे, तसेच अन्य अनेक आरोप नोंद करण्यात आले आहेत, अशी माहिती आहे.









