न्यायालयात बृजभूषण शरण सिंह यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काही महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या बृजभूषण शरण सिंह विरोधात न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. दिल्लीतील राउज अॅव्हेन्यू न्यायालयात भाजप खासदार बृजभूषण यांच्याविरोधात औपचारिक स्वरुपात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. बृजभूषण यांनी स्वत:वर झालेले आरोप नाकारत खटल्याला सामोरा जाणार असल्याचे म्हटले आहे.
न्यायाधीशांनी बृजभूषण यांना तुमच्याविरोधात 7 कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले असून तुम्हाला ते मान्य आहेत का असे विचारले. यावर बृजभूषण यांनी मी कुठलाच गुन्हा केलेला नसल्याने मानण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. यानंतर आता बृजभूषण यांच्यावर कथित लैंगिक शोषणप्रकरणी खटला चालविण्यात येणार आहे.
याचबरोबर बृजभूषण यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख विदेश दौऱ्याशी निगडित दस्तऐवज आणि सीडीआरची मागणी करत एक याचिका न्यायालयात दाखल केली आहे. विदेशात ज्या हॉटेलमध्ये कुस्तीपटू वास्तव्यास होते, त्या हॉटेलमध्ये बृजभूषण राहिले नव्हते असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला आहे. बृजभूषण यांच्या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागविले आहे. याप्रकरणी आता 1 जून रोजी सुनावणी होणार आहे.
माझ्याकडे ठोस पुरावे : बृजभूषण
बृजभूषण यांनी न्यायालयातून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांना संबोधित केले. न्यायपालिकेची एक प्रक्रिया असून त्यानुसारच चालावे लागणार आहे. आरोपपत्र दाखल झाले असल्याने आता खटला चालणार आहे. माझ्याकडे माझ्या निर्दोषत्वाचे ठोस पुरावे आहेत असे बृजभूषण यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी आणि कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनीही स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले आहेत.









