दिल्ली मद्य घोटाळ्यात 2 कोटींची रोकड, षड्यंत्र, मनी लाँड्रिंगचा आरोप :
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्याविऊद्ध 60 पानी आरोपपत्र दाखल केले. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत स्थानिक राऊस एव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात मनी लाँड्रिंगसह दोन कोटींचा रोख व्यवहार केल्याचा आणि या संपूर्ण प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मद्य घोटाळा प्रकरणात हे पुरवणी आरोपपत्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास यंत्रणेने यापूर्वी अशा सुमारे पाच फिर्यादी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी ईडीने आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना ऑक्टोबरमध्ये अटक केली होती. आरोपी व्यापारी दिनेश अरोरा याने राज्यसभा सदस्याच्या निवासस्थानी दोन हप्त्यांमध्ये 2 कोटी ऊपये रोख दिले होते, असा आरोप मनी लाँड्रिंगविरोधी एजन्सीने केला होता. मात्र सिंह यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने आप खासदाराला अटक केली होती. या प्रकरणात ते माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यानंतरचे दुसरे मोठे नेते आहेत. दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’ने ही अटक गैर असून या प्रकरणाला ‘राजकीय षड्यंत्र’ म्हटले आहे.









