लँड फॉर जॉब प्रकरण : राजद नेत्याच्या अडचणी वाढल्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सीबीआयने सोमवारी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयात लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि कंपन्यांसोबत अनेक जणांची नावे आरोपी म्हणून सामील आहेत.
राउज अॅव्हेन्यू न्यायालय याप्रकरणी 12 जुलै रोजी सुनावणी करणार आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि अन्य काही जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
राजदकडून भाजपवर निशाणा
सध्याचे राजकीय वातावरण पाहता भाजपकडून तेजस्वी यादव यांना लक्ष्य करण्यात येणार हे आम्ही ओळखून होतो. भाजपने तपास यंत्रणांचा गैरवापर करत आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या राजकारणात कुठलाच बदल घडणार नाही. देशाला हिंदू राष्ट्र होण्यापासून रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्यास आम्ही तयार आहोत असे वक्तव्य राजदचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केले आहे.
लँड फॉर जॉब घोटाळा
लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कुटुंबीयांना मोफत भूखंड देत अनेकांनी रेल्वेत कथितपणे नोकरी मिळविल्याचा आरोप आहे. 2004-2009 दरम्यान हा घोटाळा झाला होता. लाचेद्वारे नोकरी मिळविणाऱ्या लोकांकडून प्राप्त जमिनी या राबडी देवी आणि मीसा भारती यांच्या नावावर घेण्यात आल्या होत्या. याप्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांची मार्च महिन्यात चौकशी केली होती.









