वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नोकरीच्या मोबदल्यात भूखंड घोटाळा प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्राच्या स्वीकृतीसंबंधीची सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी 12 जुलैपासून होणार होती. तथापि, काही कारणामुळे ती पुढच्या महिन्यात होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या घोटाळ्यात तेजस्वी यादव यांच्यासमवेत माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि अन्य 14 जणांची नावे आरोप म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. सर्वांविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. तथापि, लालू यादव आणि राबडीदेवी यांच्या आरोपपत्राला अद्याप संबंधित विभागाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे न्यायालयातील सुनावणी एक महिना पुढे नेण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती. त्यामुळे अखेर सुनावणी 6 ऑगस्टला करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव केंद्रात रेल्वेमंत्री होते. रेल्वेत नोकऱ्या देण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी भूखंडांची लाच घेतली. नोकरी मिळविण्यासाठी आरोपींनी इच्छुकांकडे भूखंडांची मागणी केली. काही जणांनी नोकरी मिळविण्यासाठी आपले भूखंड लालू यादव आणि त्यांचे कुटुंबिय यांना स्वस्तात विकले. ही खरेदी अन्य लोकांना मधे घेऊन करण्यात आली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. 3 जुलैला सीबीआयने या प्रकरणी दुसरे आरोपपत्र सादर केले. त्यात प्रथम तेजस्वी यादव यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.









