शीखविरोधी दंगलीत सामील असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीबीआयने शनिवारी 1984 मधील शीखविरोधी दंगलींदरम्यान पुल बंगश गुरुद्वारा आगप्रकरणी 78 वर्षीय काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. जगदीश टायटलर यांनी जमावाला चिथावणी देत दंगली भडकविल्या, याच जमावाने पुल बंगश गुरुद्वाराला पेटवून दिले, ज्यात तीन शीख होरपळून मृत्युमुखी पडले होते असा आरोप आहे. याप्रकरणी सुनावणी 2 जून रोजी होणार आहे.
एप्रिल महिन्यात जगदीश टायटलर हे दिल्लीत सीबीआयसमोर हजर राहिले होते. 1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित पुल बंगश गुरुद्वाराप्रकरणी त्यांनी स्वत:च्या आवाजाचे नमुने दिले होते. केंद्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेकडून (सीएफएसएल) त्यांच्या आवाजाच्या नमुन्यांची पडताळणी केली जाणार आहे.
टायटलर यांनी नाकारले आरोप
माझ्याविरोधात एक देखील पुरावा असल्यास मी फासावर जाण्यास तयार असल्याचे टायटलर यांनी म्हटले होते. सीबीआयने याप्रकरणी काँग्रेस नेत्याला पूर्वी क्लीनचिट दिली होती. परंतु न्यायालयाने ही क्लीनचिट फेटाळत पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 4 डिसेंबर 2015 रोजी पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली होती. जगदीश टायटलर हे 2004 मध्ये मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, परंतु विरोध झाल्याने टायटलर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मागील काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने टायटलर यांच्यापासून अंतर राखले होते.
1984 मधील दंगल
1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल भडकली होती. ऑपरेशन ब्ल्यूस्टारच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. यानंतर देशभरात शीखविरोधी दंगली सुरू झाल्या होत्या. याचा सर्वाधिक प्रभाव दिल्ली आणि पंजाबमध्ये दिसून आला होता. दंगलींदरम्यान सुमारे 3500 जणांना जीव गमवावा लागला होता.









