वृत्तसंस्था/ डेहराडून
केदारनाथ आणि बद्रिनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर सखल भागात पावसामुळे रस्त्यावर मोठे दगड आल्यामुळे रात्री उशिरा चारधाम यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली. शनिवारपासून वातावरणात बदल झाला असून हवामान स्वच्छ झाल्यावर प्रत्येकजण आपला प्रवास सुरू ठेवू शकतील, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
यात्रास्थळी जाणाऱया भाविकांना जवळच्या शहरांमध्ये थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रात्रीच्या मुक्कामासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांना श्रीनगर गढवाल पोलिसांनी एनआयटी उत्तराखंड आणि बद्रीनाथ बसस्थानकाजवळ थांबवले आहे. तसेच काही भाविकांची सोय रुद्रप्रयाग येथे करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणी न करणाऱयांना श्रीनगरमध्ये राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये मुक्कामाची पुरेशी व्यवस्था असल्याने प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी यात्रेकरूंना कोविड-19 चाचण्यांसह सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतरच त्यांच्या तीर्थयात्रेचे नियोजन करण्याचा सल्ला दिला होता. राज्य सरकारने एक नियमावली जारी केली असून यावषी तीर्थयात्रा करणाऱयांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे.









