रील्स बनविणाऱ्यांना प्रवेश निषिद्ध : व्हीआयपी दर्शनही बंद : पैसे देऊनही व्हीआयपींना दर्शन घेता येणार नाही,मंदिरात व्हिडिओ आणि रील बनवण्यास बंदी
वृत्तसंस्था/देहराडून
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा यावर्षी 30 एप्रिलपासून सुरू होत आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. यावेळी चारधाम यात्रेसाठी काही नवीन नियम बनवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रील्स बनवण्रायांसाठी विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. मंदिराच्या आत व्हिडिओ आणि रील बनवण्यास मनाई आहे. सदर प्रकार उघड झाल्यास भाविकांना दर्शनाशिवाय परत पाठवले जाईल. याशिवाय व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्यात आले आहे. चारधाम यात्रा 30 एप्रिल 2025 (अक्षय तृतीया) पासून सुरू होईल. सर्वप्रथम, गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील. यानंतर, 2 मे रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील. सर्वात शेवटी 4 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील. चारधाम यात्रेसाठी यावेळी 9 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. प्रवास सुरक्षित करण्यासाठी अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
यावेळी रील निर्मात्यांना यात्रेदरम्यान मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे केदारनाथ-बद्रीनाथ पांडा समुदायाने जाहीर केले आहे. गेल्यावर्षी प्रवाशांनी व्हिडिओ बनवल्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट झाली होती. केदारनाथ धाममध्ये फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ढोल वाजवले जात होते. त्यामुळे निसर्गाची आणि भाविकांची शांतता भंग होत होती. त्यामुळे यावेळी प्रशासनाने कॅमेरा वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यावर्षी चारधाम यात्रेत व्हीआयपी दर्शनही बंद करण्यात आले आहे. बद्रीनाथ धामच्या पांडा पंचायतीचे कोषाध्यक्ष अशोक तोडरिया म्हणाले की, पैसे घेऊन दर्शन देणे हे देवाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे यावेळी सर्व भाविकांना फक्त सामान्य दर्शन घेता येईल. यामुळे सर्वांना दर्शन घेण्याची समान संधी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले.
खराब हवामानात 10 ठिकाणी थांबण्याची व्यवस्था
चारधाम यात्रेचा प्रवास मार्ग प्रत्येकी 10 किलोमीटरच्या भागात विभागला गेला आहे. प्रत्येक परिसरात 6 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जर हवामान खराब झाले तर प्रवाशांना थांबण्यासाठी 10 ठिकाणी होल्डिंग पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. येथे अन्न, पेये आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.









