पुत्र इंद्र इक्बाल यांच्या समर्थनार्थ निर्णय ः बादल कुटुंबीयांवर दुर्लक्षाचा आरोप
वृत्तसंस्था/ लुधियाना
पंजाबमध्ये अकाली दलाचे वरिष्ठ नेते चरणजीत सिंह अटवाल यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अटवाल यांनी बुधवारी शिअद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतःचे पुत्र इंद्र इक्बाल यांच्या समर्थनार्थ अकाली दलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अटवाल हे लोकसभेचे माजी उपाध्यक्ष आणि पंजाब विधानसभेचे सभापती राहिले आहेत. त्यांच्या पुत्राने 10 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपने त्यांना जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली होती.
बादल कुटुंबाकडून दुर्लक्षिले गेल्यानेच इंदर अटवाल यांनी भाजपप्रवेश केल्याचे बोलले जाते. अटवाल कुटुंब प्रारंभापासून शिरोमणी अकाली दलात कार्यरत होते. परंतु पक्षात दुर्लक्ष होत असल्याने चरणजीत सिंह अटवाल हे अनेक वर्षांपासून बादल कुटुंबावर नाराज होते.
भाजपने चरणजीत अटवाल यांचे पुत्र इंदर इक्बाल यांना जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. अटवाल यांना मागील लोकसभा निवडणुकीत जालंधर मतदारसंघात अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता.









