बाप्पांना वरेण्याने विनंती केली की, बाप्पा क्षेत्र कशास म्हणतात आणि त्याचा ज्ञात कोण असतो हे मला समजावून सांगा. उत्तरादाखल बाप्पा म्हणाले, पंच स्थूल भुते, पंच सूक्ष्म भुते, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, अहंकार, मन, बुद्धी, इच्छा, अव्यक्त किंवा मूळ प्रकृती, धैर्य, द्वेष, सुख-दु:ख आणि चेतना ह्यांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात. ह्या क्षेत्राला जाणणारा तज्ञ मी आहे.
म्हणून ह्या क्षेत्राला व मला क्षेत्रज्ञाला तू जाणून घे. त्यासाठी आवश्यक ते ज्ञान मिळवण्यासाठी सरळपणा म्हणजे आर्जव, गुरुसेवा म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेचे तंतोतंत पालन, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादिबद्दल विरक्ती, शारीरिक व मानसिक शुचिता, क्षमाशीलता किंवा सहनशीलता, ढोंग न करणे, जन्म, मरणाच्या विचाराने दु:खी न होणे, समत्व, दृढ भक्ती, एकांतवास, शमन, दमन ह्या गोष्टी नीट समजून घेऊन त्या प्रत्यक्ष जीवनात अमलात आणाव्यात. हे गुण जसजसे अंगी बाणतील तसतसे क्षेत्रज्ञाचे ज्ञान तुला प्राप्त होईल. क्षेत्रज्ञाला जाणून घेतलेस की, तू संसारसागरातून पार होऊन मुक्त होशील. त्याची एकेक वैशिष्ट्यो मी तुला सांगतो. क्षेत्रज्ञ अनादि आहे, त्याला कोणतीही इंद्रिये नाहीत, तरीही तो गुणांचा उपभोग घेत असतो. तो विश्वाचे भरण-पोषण करतो. तो विश्वव्यापक आहे.
अंतर्बाह्य परिपूर्ण आहे. नि:संग त्रिगुणाच्या पलीकडे आहे. अतिसूक्ष्म असल्याने जाणून घेण्यास अतिकठीण आहे. चंद्र, सूर्यादि प्रकाश देणाऱ्या वस्तूंना तो प्रकाशित करतो. ह्याप्रमाणे क्षेत्रज्ञाची वैशिष्ट्यो सांगून झाल्यावर पुढे बाप्पा म्हणाले, क्षेत्रज्ञ हाच परब्रह्म, आत्मा, परमात्मा होय. हा प्रकृतीहून भिन्न असून प्रकृतीच्या गुणांचा भोक्ता आहे.
प्रकृती किंवा माया देहामध्ये सत्व, रज, तम गुणांनी क्षेत्रज्ञाला बद्ध करते. सत्वगुण अधिक असेल तर त्याच्या ज्ञानाची व शांतीची वाढ होते. जर लोभ, अशांती, इच्छा, कर्मात व्यस्त राहणे असेल तर रजोगुण वाढलेला आहे असे समजावे तर अज्ञान, चुकीच्या गोष्टी करण्याची आवड दिसून येत असेल तर तमोगुणाची वाढ झाली आहे, असे समजावे. जर रजोगुण वाढलेला असेल तर मनुष्य सतत काही ना काही करत राहतो. जर तमोगुण वाढलेला असेल तर त्याला झोप, आळस व दु:ख घेरून टाकतात.
ज्या माणसाच्या स्वभावात सत्वगुण अधिक असेल तो मुक्त होतो, रजोगुण वाढलेला असेल तो पुन्हा जन्माला येतो आणि तमोगुण जास्त असलेला मनुष्य दुर्गतीस जातो. म्हणून माणसाने सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्याच्या स्वभावात बदल होत जाऊन त्यांची वागणूक आपोआपच नित्य सात्विक होईल. हे असे घडून येण्यासाठी सर्व अणुरेणु व्यापून असलेल्या माझी तू मनोभावे आणि एकनिष्ठेने भक्ती कर. सूर्य, चंद्र, तर्क, विद्वान ब्राह्मण हे जरी तेज:पुंज दिसत असले तरी त्यांच्या ठिकाणी असलेले तेज हे माझेच तेज आहे हे लक्षात घे. तसेच सर्व विश्व मी निर्माण केले असून मीच त्याचे विसर्जन करतो. मीच वनस्पती व विश्वाला माझ्या तेजाने पुष्ट करतो. मी सर्व इंद्रियांमध्ये असून जठराग्नीत, धनंजय ह्या उपप्राणात अधिष्ठित राहून सर्व भोगांचा उपभोग घेतो पण मी कशात गुंतत नसल्याने मला पाप, पुण्य लागत नाही.
ब्रह्मा, विष्णू, गौरी, गणपती ही माझीच रूपे आहेत. इंद्रादिक लोकपाल हेही माझेच अंश आहेत. भक्त माझी ज्या ज्या रुपात उपासना करतात त्या त्या रुपात मी त्यांना दर्शन देतो. राजा अशाप्रकारे क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञात, ज्ञान, ज्ञेय ह्या विषयी मी तुला सर्व सांगितले आहे. जीवात्मा व परमात्मा ह्यात तत्वत: भेद नाही. सर्व भुतांच्या ठायी एकच परमात्मा वास करत असतो.
श्रीगणेशगीता अध्याय नऊ सारांश समाप्त








