नगरसेवक हेमंत ना. गावकर यांची मागणी
काणकोण : काणकोण तालुक्याची जीवनदायिनी असलेले चापोली धरण हे निसर्गसौंदर्याने नटलेले असून या निसर्गसौंदर्याचा त्याचप्रमाणे चापोली धरणावरील ताज्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी तालुक्याच्या विविध भागांतील तसेच अन्य भागांतील लोक खास करून पावसाळयात येत असतात. मात्र दोन-तीन वर्षांपूर्वी या धरणाजवळ गाजलेल्या एका मॉडेलने आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीत करण्याच्या प्रकरणामुळे या धरणाचे प्रवेशद्वार सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. हा विशेषत: काणकोणच्या नागरिकांवर अन्याय असून हे धरण त्यांच्यासाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी काणकोण पालिकेच्या नगर्से वॉर्डाचे नगरसेवक हेमंत ना. गावकर यांनी केली आहे. चापोली धरणाला भिडून असलेल्या ओढ्याची मजा घेण्यासाठी तसेच या ठिकाणी असलेल्या रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी काणकोणातील लोक मागच्या कित्येक वर्षांपासून येथे येत आलेले आहेत. सदर धरणावर या भागातील लोक गर्दी करत असत. चापोली धरणाच्या सुरक्षेसाठी जरूर रक्षक नेमावेत, रात्रीच्या वेळी रक्षकांची नेमणूक करावी. पण म्हणून स्थानिक लोकांना एका चांगल्या स्थळापासून वंचित करणे संयुक्तिक नसून एका मॉडेलने केलेल्या चुकीची शिक्षा स्थानिक नागरिकांनी का भोगावी, असा सवाल गावकर यांनी केला आहे.









