गिनीजच्या विक्रम पुस्तिकेत नाव येणे हे प्रतिष्ठेचे मानले जाणे स्वाभाविक आहे. अनेक लोक विविध प्रकारचे असे क्रियाकलाप करतात की ज्यांमुळे त्यांचे नाव या विक्रम पुस्तिकेत नोंद केले जाते. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील चप्पल निर्माता रमेश दशरथ चित्रे यांचे नाव नुकतेच या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहे.

चित्रे हे या भागातील नामवंत चर्मकार आहेत. त्यांचे शिक्षण अवघे तिसरी पर्यंत झाले आहे. आपण आपल्या क्षेत्रात विक्रम करावा आणि आपले नाव गिनीज पुस्तेकेत यावे अशी त्यांची बऱ्याच पूर्वीपासूनची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी रेक्झिन मॅट पासून 5 फूट 3 इंच लांबीची चप्पल बनविली आहे. साधारणत: एका माणसाच्या उंचीची ही चप्पल आहे. या चपलेचे वैशिष्ट्या असे की ती त्यांनी केवळ तीन दिवसांमध्ये बनविली असून इतकी मोठी चप्पल इतक्या कमी वेळेत बनविणारे चित्रे हे जगातील पहिले कारागिर झाले आहेत. ही चप्पल पाहण्यासाठी अनेक लोक त्यांच्या दुकानी गर्दी करतात. चित्रे गेली 25 वर्षे या व्यवसायात आहेत. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून त्यांचे पिताही हाच व्यवसाय करीत असत. ते विविध प्रकारच्या चपला बनवितात. त्यात कोल्हापुरी चपलेचाही समावेश आहे. ते लोकांच्या ऑर्डरींप्रमाणे त्यांच्या आवडीच्या प्रकारच्या चपला बनवून देतात. अनेक महनीय आणि ख्यातनाम व्यक्ती त्यांच्याकडून चपला करुन घेतात. आता गिनीज पुस्तिकेत त्यांचे नाव समाविष्ट झाल्याने त्यांना त्यांच्या व्यवसायातही याचा लाभ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वात मोठी चप्पल बनविण्याचा हा विक्रम आपण ठरवून केला असल्याचेही ते प्रतिपादन करतात. भविष्यकाळात याहीपेक्षा मोठी चप्पल बनवून आपलाच विक्रम मोडण्याचाही त्यांचा विचार आहे.
इतक्या मोठ्या चपलेचा व्यवहारात उपयोग काय असा प्रश्नही त्यांना विचारला जातो. तथापि, त्यांच्या या विक्रमाचा उपयोग न पाहता त्यांच्या कारागिरीचे कौतुक करणारेही अनेक लोक आहेत.









