लोकसभा-राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. पहिला दिवस काहीच काम न होता गदारोळातच पार पडला. राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवर आवाज उठवत गदारोळ केल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी 2 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षांनी मणिपूरमधील परिस्थितीवरील चर्चेवरून गदारोळ सुरू केल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरू केल्याबद्दल सत्ताधारी भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मणिपूरसारख्या गंभीर मुद्द्यावर सरकारची चर्चेची तयारी असताना विरोधकांना यात सहभागी व्हावेसे वाटत नाही, असा आरोप संसदीय कामकाजमंत्र्यांनी केला आहे. तसेच संसद सभागृहांचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्धार विरोधकांनी केलेला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला. मणिपूरप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये वेळोवेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये महिला शक्तीची अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकार मणिपूरच्या घटनांबाबत गंभीर असून आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे सरकारने स्पष्ट केलेले असतानाही काँग्रेससह इतर विरोधकांना सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
सुरुवातीला राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चेची मागणी करत गदारोळ सुरू केला. यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारी दोन वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
मोदी-सोनियांमध्ये संवाद
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुऊवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेच्या सभागृहात संक्षिप्त संवाद साधला. पावसाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अनेक नेत्यांना अभिवादन केले. या संवादादरम्यान ते सोनिया गांधींशी चर्चा करण्यासाठी विरोधी बाकावर काहीवेळ थांबले. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा आहे.









