जेएमएफसीत पार्किंग समस्या गंभीर : शिस्तीसाठी पाऊल उचलण्याची गरज : बेशिस्तीला आवर घालणे आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
जेएमएफसी न्यायालय आवारात पार्किंग समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या समस्येमुळे वकिलांबरोबरच पक्षकारही अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या समस्येला कारण म्हणजे पूर्वीपासून पार्किंगसाठी कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे हा फटका आता बसू लागला आहे. मात्र, यासाठी आता संयुक्तपणे शिस्त लावण्याची गरज असून बेशिस्तपणाला कोठे तरी आवर घालण्याची गरज निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
जेएमएफसी न्यायालय आवारात नवनवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, पार्किंगबद्दल कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. त्याचा फटका आता बसू लागला आहे. अलीकडेच कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीची उभारणी करण्यात आली. त्यावेळी पार्किंगची सोय करावी, यासाठी काही दिवस काम बंद करण्यास भाग पाडले होते. तरीदेखील मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याचे परिणाम आता साऱ्यांनाच सोसावे लागत आहेत. न्यायालय आवारात पुन्हा पार्किंगला बेशिस्तपणा आला आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वाहने पार्क केली जात आहेत. यामुळे ये-जा करताना साऱ्यांनाच अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांना पार्किंगची शिस्त लावण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले. पण हे प्रयत्न अपयशीच ठरत आहेत.
मुख्य जिल्हासत्र आणि जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये पार्किंगला शिस्त लावण्यासाठी आता होमगार्डकडून पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, कितपत यश येणार हेही पाहावे लागणार आहे. दुचाकीसाठी आणि चार चाकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. पण चार चाकीच्या ठिकाणी दुचाकी पार्क केल्या जात आहेत. दुचाकीच्या ठिकाणी चार चाकी पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे अक्षरश: पार्किंगला बेशिस्तपणा आला आहे. जेएमएफसी न्यायालय आवारात याहून गंभीर परिस्थिती आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे ये-जा करताना मोठी समस्या निर्माण होत आहे. सुरक्षारक्षक थांबून बऱ्याच वेळा वाहनचालकांना सूचना करत आहेत. पण त्यांच्याबरोबरही वाद घालण्याच्या घटना घडत आहेत. न्यायालय आवारबाहेर वाहन पार्क केल्यास वकिलांना तसेच पक्षकारांना धावपळ करून न्यायालयात यावे लागत आहे.
सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत एका पाठोपाठ एक वाहने पार्क केली जात आहेत. सायंकाळपर्यंत ही समस्या आता नित्याचीच बनली आहे. त्यामुळे आतमध्ये लावलेल्या दुचाकी काढताना अथळा निर्माण होत आहे. बऱ्याच वेळा दुचाकी काढताना इतर वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या पार्किंग व्यवस्थेला सारेच जण कंटाळले आहेत. असे असले तरी आपणापासूनच शिस्त बाळगणे गरजेचे आहे. एकमेकांकडे बोट करून चालणार नाही, हेही साऱ्यांनीच ध्यानात घेणे गरजेचे असल्याचे मत काही वकिलांनी क्यक्त केले. आता बार असोसिएशनच्यावतीने वकील व पक्षकार सोडून इतरांना आत प्रवेश दिला जाणार नाही, असे पत्रक काढण्यात आले आहे. बार असोसिएशनने मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे पार्किंग समस्येबाबत गाऱ्हाणे मांडले. त्यावर न्यायाधीशांनी पोलीस खात्याला सांगून होमगार्डची नियुक्ती करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. बार असोसिएशनच्यावतीनेही आता सकाळी 10.30 ते दुपारी 2 पर्यंत इतर कोणालाही न्यायालयाच्या आवारात पार्किंग करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात पार्किंग समस्या सुरळीत होणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.









