सभापतींनी चार भाजप आमदारांना केले निलंबित : गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी मोठा गोंधळ झाला. अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांच्यासह चार भाजप आमदारांना सभागृहातून निलंबित केले. त्यांच्यावर सभापतींच्या आदेशांचे उल्लंघन करणे आणि कागदपत्रे फाडणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यातील कामकाजावेळी भाजप आमदार आणि अर्थशास्त्रज्ञ अशोक लाहिरी आणि इतर भाजप नेत्यांच्या टिप्पण्या सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकल्याबद्दल भाजप आमदारांमध्ये नाराजी होती. सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या भाषणादरम्यान वारंवार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभापतींनी प्रथम भाजप आमदारांना त्यांच्या जागी बसण्यास सांगितले. मात्र, त्यांनी सभापतींच्या सूचना न मानता गोंधळ चालूच ठेवल्यामुळे सभापतींनी शंकर घोष, अग्निमित्र पॉल, दीपक बर्मन आणि मनोज ओरांव यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले. या आमदारांनी टेबलांवरील माईक तोडणे आणि कागदपत्रे फाडणे असे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.
भाजपचे सभागृहातून वॉकआऊट
सभागृहाबाहेर जाण्यापूर्वी अग्निमित्र पॉल आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदार असिमा पात्रा यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. तथापि, इतर तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी प्रकरण जास्त वाढू दिले नाही. यानंतर, विधानसभेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भाजपच्या चार आमदारांना सभागृहाबाहेर काढले. सभापतींनी स्वपक्षियांवर केलेल्या कारवाईनंतर इतर भाजप आमदारांनीही 20 मिनिटे निषेध करून सभागृहातून वॉकआऊट केले.









