अर्ज करूनही पुन्हा त्याच चुका : नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : महापालिकेच्या जन्म व मृत्यू दाखले वितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे. जन्म दाखले देण्यासंदर्भात दिलेल्या अर्जात अर्जदारांनी पूर्ण नाव घालूनही केवळ पहिलेच नाव घालून जन्म दाखला दिला जात आहे. मात्र असे दाखले शाळांमध्ये ग्राह्या धरले जात नसल्याने पालकांना पुन्हा महापालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जन्म-मृत्यू दाखल्यांचे वितरण केले जाते. यासाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यरत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही व्यवस्था सोयीची कमी गैरसोयीचीच अधिक ठरू लागली आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करून आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे पालक आधार केंद्रांवर जात आहेत. मात्र यापूर्वी देण्यात आलेल्या बहुतांश मुलांच्या जन्म दाखल्यात मुलाच्या नावापुढे पालक आणि आडनाव नाही. त्याचबरोबर वडील व आईचे नाव देखील पूर्ण नाही. त्यांचाही केवळ पहिल्याच नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसे जन्म दाखले ग्राह्या धरले जात नसल्याने पूर्ण नावानिशी दाखले मिळावेत यासाठी पालकांची जन्म दाखला मिळविण्यासाठी महापालिकेत गर्दी होत आहे. यासाठी अॅफिडेव्हिट बाँड व अर्ज दिला जात आहे.
अर्जांमध्ये पूर्ण नावानिशी जन्म दाखला देण्यात यावा, अशी मागणी केली जात असली तरी जन्म मृत्यू दाखले विभागात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी पुन्हा केवळ पहिल्या नावाचाच उल्लेख करून दाखले देत आहेत. अनेकवेळा मॅरेज सर्टिफिकेट किंवा न्यायालयाचा आदेश आणण्यासही सांगितले जात आहे. सर्व्हर समस्या व इतर कारणे सांगून जन्म दाखले देण्यास विलंब केला जात आहे. दिलेल्या दाखल्यात पुन्हा चुका केल्या जात असल्याने याचा फटका पालकांना बसत आहे. सध्या महापालिकेतील जन्म-मृत्यू दाखले विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.
काही जण रांगेत थांबून अर्ज दाखल करणे व घेण्याऐवजी थेट जन्म-मृत्यू दाखले विभागातच प्रवेश करत आहेत. अधिकाऱ्यांना खूष केल्यानंतर तातडीने दाखले दिले जात आहेत, असा आरोप केला जात आहे. मात्र सरळरित्या अर्ज केलेल्यांना महिनाभर वाट पाहूनदेखील पुन्हा चुकीचे दाखले दिले जात आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. जन्म व मृत्यू दाखले वितरण करण्यासाठी केवळ दोनच काऊंटर असल्याने नागरिकांना दिवसभर रांगेत थांबावे लागत आहे. पूर्ण नावानिशी दाखले देण्याऐवजी केवळ पहिले नाव घालून दाखले देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. एका दाखल्याच्या प्रतीसाठी अर्जदारांना 40 रुपये मोजावे लागत आहेत.
फाईलच्या चोरीची चर्चा
जन्म व मृत्यू दाखले विभागातून एका दुरुस्तीच्या फाईलची चोरी झाल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. विरोधी गटातील एका नगरसेवकाने परस्पर फाईल उचलली असली तरी याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीच कारवाई न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकाराची सध्या महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.









