वृत्तसंस्था/ सेऊल
दक्षिण कोरियाच्या संसदेत महाभियोगावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान आणि कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष हान डुक-सू यांना महाभियोग चालवत पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या हकालपट्टीच्या बाजूने 192 मते पडली. संसदेतील कामकाजावेळी खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली. सत्ताधारी पक्षाने मतदानावर बहिष्कार घातल्याने कार्यवाहक राष्ट्रपतींविरुद्धच्या महाभियोग प्रस्तावाच्या विरोधात एकही मत पडले नाही. आता अर्थमंत्री चोई संग-मोक कार्यवाहक अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. चोई साँगने 3 डिसेंबर रोजी मार्शल लॉ लागू करण्यास उघडपणे विरोध केला होता. ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युन सुक येओल यांनी 3 डिसेंबर रोजी देशात आणीबाणी (मार्शल लॉ) लागू केली होती. मात्र, विरोधकांच्या प्रयत्नांमुळे ते केवळ 6 तासच कायम राहिले. विरोधी पक्षाने संसदेत मतदानाद्वारे मार्शल लॉ प्रस्ताव बेकायदेशीर घोषित केला होता. यानंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना हटवण्यात आले. यानंतर, 14 डिसेंबर रोजी हान डुक-सू यांना कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आले, परंतु ते केवळ 13 दिवस या पदावर राहिले.









