सोशल मीडियावरील बंदीविरोधात शेकडो निदर्शक संसदेत घुसले : काठमांडूसह अनेक शहरांमध्ये पसरला हिंसाचार
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी आणल्याविरोधात युवकांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले. राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरल्यानंतर या आंदोलनला हिंसक वळण लागले. त्यामध्ये आतापर्यंत 20 युवकांचा मृत्यू झाला. काठमांडूमध्ये एकीकडे सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर दुसरीकडे युवक अद्यापही माघार घेण्याच्या भूमिकेत नसल्यामुळे नेपाळमध्ये अनागोंदी पसरली आहे. काठमांडूमधील न्यू बानेश्वर आणि झापा जिह्यातील दमक येथे परिस्थिती सर्वात भयावह बनली आहे. राजधानीतील हिंसाचाराचे लोण आता अन्य शहरांमध्ये पसरत असल्याने वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. दरम्यान, देशात उसळलेल्या हिंसाचारानंतर सोमवारी सायंकाळी उशिराने सोशल मीडिया पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समजते.
नेपाळमध्ये अलीकडेच 26 प्रमुख सोशल मीडिया अॅप्सवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. सरकारी भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील अलिकडच्या बंदीविरोधात नेपाळमध्ये निदर्शने तीव्र झाली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याच्या तोफांचा मारा केला आणि काही ठिकाणी गोळीबारही केला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 20 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो तरुण जखमी झाले. भडकलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
…अन् दिसताक्षणी गोळीबाराचे आदेश
नेपाळमध्ये सरकारविरुद्धच्या निदर्शनादरम्यान 20 जणांचा मृत्यू झाल्याची नेपाळ पोलिसांनी पुष्टी केली आहे. तसेच 200 हून अधिक तरुण जखमीही झाले. या निषेधाचे नेतृत्व ‘जनरेशन-झेड’ म्हणजेच 18 ते 30 वयोगटातील तरुण करत आहेत. सोमवारी सकाळी 12 हजारांहून अधिक तरुण निदर्शकांनी सोशल मीडियावरील बंदी आणि सरकारी भ्रष्टाचाराविरुद्ध संसद भवनाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर लष्कराने अनेक राउंड गोळीबार केला. हिंसाचार वाढत गेल्यानंतर काठमांडू प्रशासनाने तोडफोड करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचे समजते.
संसदेतील घुसखोरीची पहिलीच घटना
नेपाळच्या इतिहासात संसदेत घुसखोरीची ही पहिलीच घटना आहे. निदर्शकांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केल्यानंतर संसद भवन, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान निवासस्थानाजवळील भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ‘जनरेशन झेड’ने रस्त्यावर उतरत निदर्शने करताना तरुणांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. याप्रसंगी अनेक निदर्शक संसद भवनातही घुसले. सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते अधिकच संतप्त होऊन बॅरिकेड्सवरून उडी मारून इकडे तिकडे पळू लागले. यादरम्यान सुरक्षा दलांवर दगडफेकही करण्यात आली.

विविध इस्पितळांमध्ये उपचार
ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पोहोचलेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्याचे ट्रॉमा सेंटरचे डॉ. दीपेंद्र पांडे यांनी सांगितले. येथे दाखल झालेल्या निदर्शकांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या लागल्या आहेत. सध्या दहा रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याशिवाय 20 हून अधिक जखमींवरही उपचार सुरू आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे सिव्हिल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक मोहन चंद्र रेग्मी यांनी सांगितले. केएमसी आणि त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख अद्याप उघड झालेली नाही.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आमंत्रित
भ्रष्टाचाराविरुद्ध ‘जनरेशन झेड’ या निदर्शनाला हिंसक वळण लागल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक पंतप्रधानांच्या बालुवातार येथील निवासस्थानी झाली. सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्त्वात बैठकीत चर्चा झाली. द हिमालयन पोस्टमधील वृत्तानुसार, काठमांडू जिल्हा प्रशासनाने दुपारी 12:30 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत प्रमुख भागात कर्फ्यू लागू केला आहे.

सरकारकडून 3 सप्टेंबरला सोशल मीडियावर बंदी
नेपाळ सरकारने 3 सप्टेंबर रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबसह 26 सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या प्लॅटफॉर्मची नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी नव्हती. यासाठी मंत्रालयाने 28 ऑगस्ट रोजी एक आदेश जारी करत 7 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत 2 सप्टेंबर रोजी संपल्यानंतर 3 सप्टेंबरपासून सोशल मीडियावर बंदी घालण्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.
सोशल मीडियावर बंदी का घातली?
सरकारच्या म्हणण्यानुसार, नेपाळमधील सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी 28 ऑगस्टपासून सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. गेल्या बुधवारी जेव्हा ही मुदत संपली, तेव्हाही मेटा (फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप), अल्फाबेट (यूट्यूब), एक्स (पूर्वीचे ट्विटर), रेडिट आणि लिंक्डइन यासारख्या प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मने नोंदणी केली नाही. त्यानंतर सरकारने गुरुवारपासून या कंपन्यांवर बंदी घातली होती.
सरकारची बळजबरी नको : निदर्शक
निदर्शकांनी नेपाळ सरकारवर दडपशाहीचा आरोप केला आहे. आम्हाला शांततेत निषेध करायचा होता, परंतु आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला दिसले की पोलीस लोकांवर हल्ला करत आहेत आणि गोळीबार करत आहेत. सत्तेत असलेले लोक आपल्यावर त्यांची शक्ती लादू शकत नाहीत. भ्रष्टाचारविरोधी निदर्शने दडपली जात आहेत, जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अधिकाराविरुद्ध असल्याचे एका निदर्शकाने सांगितले.
नेपाळी सेलिब्रिटींचा निदर्शकांना पाठिंबा
नेपाळमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी निदर्शकांना पाठिंबा दिला आहे. अभिनेते मदन कृष्ण श्रेष्ठ आणि हरीवंश आचार्य यांनी फेसबुकवर तरुणांचे कौतुक केले. एक नवीन रस्ता काही दिवसातच खराब होण्याचा मुद्दा आचार्य यांनी उपस्थित करत ‘मी दररोज विचार करायचो की हा रस्ता इतक्या लवकर का खराब झाला. पण तरुण फक्त विचार करत नाहीत, ते प्रश्न विचारतात. तो का तुटला? कसा? कोण जबाबदार आहे? हे एक उदाहरण आहे. तरुण व्यवस्थेविरुद्ध नाहीत, तर नेत्यांच्या चुकांविरुद्ध लढत आहेत’, असे आचार्य म्हणाले. त्यांनी नेत्यांना चांगले काम करायला आणि तरुणांना जबाबदारी देण्यास सांगितले. त्याचवेळी, मी नेपाळचा प्रत्येक टप्पा पाहिला आहे. लोकांचे आवाज दाबले गेले, घराणेशाही वाढली आणि सत्तेचा लोभ शिगेला पोहोचला. दररोज हजारो तरुणांना परदेशात काम करण्यास भाग पाडले जात आहे. भ्रष्टाचार खूप वाढला आहे. तरुणांसह लोकांचा रोष वाढत आहे. त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल, असे अभिनेते मदन कृष्ण श्रेष्ठ म्हणाले.









