कैद्यांना सुविधा पुरविण्यावरून अधिकाऱ्यांत हाणामारी, वरकमाईसाठी धडपड
बेळगाव : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणानंतर कारागृहातील कैद्यांची बडदास्त ठेवल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील कारागृह विभागाला खडसावल्यानंतरही कारागृहातील व्यवस्थेत म्हणावे तसे फरक पडले नाहीत. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातही बेंगळूर येथील काही कैद्यांची बडदास्त ठेवण्यात आली असून त्यांना सुविधा पुरविण्यावरूनच अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. या ना त्या कारणाने हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह नेहमी ठळक चर्चेत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी याच हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून फोन करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण होतो न होतो कारागृहातील आणखी अनेक प्रकरणे हळूहळू उघडकीस येऊ लागली आहेत. काही बलवान कैद्यांना सुविधा पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
कैद्यांना सहजपणे मोबाईल मिळू नये, यासाठी कारागृहात जामर बसविण्यात आला आहे. त्याचा फटका कारागृहातील कैद्यांना बसल्याचे दिसत नाही. उलट हिंडलगा, विजयनगर परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. जामर असूनही कारागृहातील काही भागात मोबाईलचे नेटवर्क येते. याच तांत्रिक बाबींचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी काही कैद्यांना मोबाईलसह इतर सुखसोयी पुरविल्याची माहिती मिळाली आहे. स्वस्तात सोने देण्याचे सांगून कारागृहातील अनेक अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बेंगळूर येथील एका कैद्याला सर्व सोयी पुरविण्यात आल्या आहेत. त्याला सहजपणे मोबाईल मिळावा, यासाठी स्वतंत्र विभागात ठेवण्यात आले असून ज्या डेटिन्यू विभागात रेंज मिळते, तेथे त्याची बडदास्त ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याच मुद्द्यावरून अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
बेंगळूरहून आलेल्या एका कैद्याने ‘दावणगिरीत मोठ्या प्रमाणात सोने आहे. मला पाच लाख रुपये द्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला 20 लाखांचे सोने देतो’, असे सांगत कारागृह अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला आहे. ही रक्कम सुमारे 1 कोटीच्या घरात आहे. रक्कम जमवल्यानंतर सोने तर नाहीच, घेतलेले पैसेही त्या कैद्याने परत केले नाहीत. त्यामुळे पैसे दिलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी त्याला मिळणाऱ्या सुखसोयी रोखल्या होत्या. मात्र, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीखातर त्याची बडदास्त ठेवण्यात आली आहे. ‘बोल बच्चन’ला सुविधा पुरविण्याच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले असून ही गटबाजी हाणामारीपर्यंत पोहोचली आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी कारागृहाचे अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. कारागृहातील संपूर्ण यंत्रणेचा वरकमाईसाठी काही अधिकारी वापर करीत आहेत. वेळीच गटबाजी थांबली नाही तर या गटबाजीतून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
कैद्यांकडूनच अधिकाऱ्यांचे ब्लॅकमेलिंग
बेंगळूरहून बेळगावात स्थानबद्धतेत ठेवण्यात आलेल्या एका कैद्याने कारागृहातील काही गैरप्रकारांचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे. त्या व्हिडिओंची भीती दाखवत काही अधिकाऱ्यांना नाचवण्याचे कामही त्याने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. बेंगळूर, बळ्ळारी, गुलबर्गा कारागृहातील काही व्हिडिओही त्याच्याजवळ आहेत, अशी माहिती मिळाली आहे. कारागृहात अनेक कैद्यांकडे मोबाईल आहेत. पोलीस यंत्रणा ज्या ज्यावेळी कारागृहावर छापा टाकून तपासणी करते, त्यावेळी मात्र काहीच सापडत नाही.









