म्हसवड :
राजकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या व तीन गटांचे वर्चस्व असलेल्या माण तालुक्यातील देवापूर येथील देवापूर विकास सेवा सोसायटीचे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान आहे. शुक्रवारी 28 मार्च रोजी चुलतीचे 5 माणसांचे रेशनिंग कार्ड असलेल्या दुकानदाराने 3 माणसांचे धान्य दिले. हे विचारण्यास सागर बाबर गेले असता संजय व शंकर बाबर यांनी तू कोण विचारणार, असे म्हणत सागर यास मारहाण केली. सोडवा–सोडवीनंतर दुपारी बाराच्या दरम्यान सागर बाबर व शंकर बाबर यांच्या दोन गटात ग्रामपंचायत कार्यालय इमारतीमधील सोसायटीच्या दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्हीसमोरच तुफान हाणामारीची ही घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात परस्पर दोन्ही बाबर कुटुंबातील 16 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशन करत आहे.
याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनवरुन मिळालेली माहिती अशी, शुक्रवार, दि. 28 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान सोसायटीच्या रेशनिंग दुकानासमोर संजय धोंडीराम बाबर व शंकर बाबर, हेमंत बाबर, शामराव बाबर, जालिंदर बाबर, जितेंद्र बाबर, उत्तम बाबर, राहुल बाबर (सर्व रा. देवापूर) यांच्यात व माजी सरपंच शहाजी बाबर, सयाजी बाबर, सागर बाबर, ज्ञानदेव बाबर, रावसाहेब बाबर, विजय बाबर, आनंदा बाबर, जनार्दन बाबर (सर्व रा. देवापूर) यांच्यामध्ये काठी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण झाली. दोन्ही गटातील चौघे जखमी झाले असून शंकर बाबर व संजय बाबर या दोघांना म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सागर बाबर व इतर एकजण सातारा सिव्हिल येथे उपचार घेत आहेत. याप्रकरणी दोन्ही गटातील 16 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी या तथाकथित राड्याचे चित्रीकरण ग्रामपंचायतीच्या व सातारा डीसीसी बॅंकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. म्हसवड पोलिस या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन मारामारीचे खरे बिंग उघड करुन पोलिसांचे ब्रीदवाक्य असलेले ‘सद्रक्षणाय, खल निग्राहणाय’ला शोभेल असा तपास करण्याचे आवाहन म्हसवड पोलिसांपुढे आहे.








