सांगली :
चार मंडळांच्या डीजेच्या दणदणाटाने बुधगाव येथे आजारी वयोवृध्द महिला आणि रुग्णांना झालेला जीवघेणा त्रास, सांगलीच्या शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर मिरवणुकीत झालेला चाकूने भोसकण्याचा प्रकार आणि पद्माळे व डिग्रज येथे कृष्णा नदीत बुडालेल्या दोन युवकांच्या घटनेने यंदाच्या गणेशोत्सवातील समारोपाला गालबोट लागले. डीजेच्या दणदणाटाकडे पोलिसांनी केलेले सोयीस्कर दुर्लक्ष, राजकीय नेते मंडळींकडून मंडळांना दिलेली भरघोस देणगी त्यातून गणेशोत्सवासारख्या चांगल्या उत्सवात यंदा सांगली परिसरात काही मंडळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून एकप्रकारे धुडगुस सुरू आहे. या प्रकारामुळे गणेश भक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सांगली ही गणरायाची पंढरी मानली जाते. सांगली आणि गणेशोत्सव ही आगळीवेगळी आणि वैशिष्टपूर्ण परंपरा आहे. या कालावधीत अकरा दिवसात एक मोठा उत्सव साजरा केला जातो. सांगलीमधील देखावे पाहण्यासारखे असतात. मिरजेतील मिरवणुकीलाही मोठी परंपरा आहे. येथील स्वागत कमानी आणि सांगली परिसरातील कुपवाड, माधवनगर आणि कर्नाळ येथील जिवंत देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. पण मागील काही वर्षापासून सांगलीच्या गणेशोत्सवामध्ये लेझीम, ढोल, धनगरी ढोल वादन, गीत नृत्याचा कार्यक्रम यासारख्या पारंपारिक कार्यक्रमाऐवजी डीजे डोळयाला त्रास होणारी विद्युत रोषणाई, आणि मद्यप्राशन करून मिरवणुकीतील धाबडधिंगा यामुळे उत्सवातील आनंद लुप्त होत आहे.
सातव्या दिवशी सांगलीमधील सत्तर टक्के मंडळांचे विसर्जन होते. या दिवशी देखावे आणि मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. मिरवणुकीमध्ये रात्री हाणामाऱ्या आणि चाकूने भोसकण्याइतपत टवाळक्यांची मजल गेली. मिरवणुकीत मद्यधुंद अवस्थेतील तरूणांनी प्रचंड धुडगुस घातला.
यातून वादावादी, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, चाकूने भोसकण्याचे प्रकार घडले. तरूणांच्या या हिंस्त्र प्रकाराने गणेशभक्तांमध्ये घबराट निर्माण झाली. गावभागातील एका मंडळासमोर किरकोळ बाचाबाची झाली. रात्री अकराच्या सुमारास बस स्थानक परिसरात आलेल्या मंडळासमोर शहराच्या आसपासच्या गावातून देखावे बघण्यास आलेल्या तरूणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर शस्त्र काढण्यात झाले. दोघांनी शस्त्र काढत धिंगाणा घातला.
रात्री बाराच्या सुमारास मृत्युजंय चौकात टोळक्यांमध्ये धक्काबुक्की आणि ढकलाढकली झाली. यामध्ये महिलांनाही धक्काबुक्की झाली. वाहने गटारीत पडली. यानंतर एकाने चाकू काढून दुसऱ्याच्या पोटात भोसकला. यामुळे एक तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला. या प्रकाराने गणेशभक्तांमध्ये घबराट पसरली. असाच प्रकार स्टेशन रोडवरही घडला.
- पोलिसांकडून सौम्य लाठीमार
सांगली-मिरज रोडवरील कर्मवीर चौकातून जिल्हा परिषदेसमोर जात असलेल्या मंडळाच्या मिरवणुकीत एका टोळक्याने शस्त्र काढली. गंगर आय नेशनच्या लोखंडी शटरवर एकाचे डोके आपटून त्याला मारहाण करण्यात आली. याचवेळी चर्चसमोरील बस स्टॉपपासून दोन गटातील तरूण पाठलाग करत होते. यावेळी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भालेवर यांनी स्वतः तेथे जावून सौम्य लाठीमार केला.
- काँग्रेस कमिटी चौकातही राडा
सातव्या दिवसाच्या विसर्जनावेळी शहरातील काँग्रेस कमिटी चौकात रात्री ११.३० च्या सुमारास मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात राडा झाला. मिरवणूक चौकात आली असता, तरूण किरकोळ कारणावरून एकमेकाच्या अंगावर धावून गेले, त्यानंतर धक्काबुक्की आणि नंतर हाणामारीत पर्यावसन झाले. पोलिसांची कुमक कमी असल्याने, मारामारी आटोक्यात आणताना तारांबळ उडाली. मारामारी सुरू असतानाच, मृत्यूंजय चौकात तरूणांमध्ये चाकूने वार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अपुऱ्या बंदोबस्तामुळे रात्री पोलिसांची फजिती झाली.
- नशेड्यांमुळे चॉकलेट विजेत्यांची पोलखोल
पालकमंत्र्यांच्या प्रत्येक दौऱ्यावेळी नशेची एक कारवाई करून, चॉकलेट मिळवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे पितळ गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये उघडे पडले. अनेक मिरवणुकीत बेधुंद नशेड्यांनी धुडगूस घातला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असला, तरी मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या मिरवणुकांबरोबर हा बंदोबस्त चालत नव्हता. शहरात स्टेशन चौकापुढे ढिगभर पोलीस हातात दांडकी घेऊन मिरवत होते. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलीस, तर मिरवणुकीचा स्थानिक पोलीस वाहत होते. शहरात अनेकठिकाणी नशेड्यांनी मारामाऱ्या केल्या. स्थानिक नागरिकांनी फोन करून पोलिसांना बोलावून नशेड्यांना पांगवले, तरीसुद्धा जिल्हा परिषदेसमोर आणि सांगली स्टँडजवळ सशस्त्र हल्ले झाले. नशेच्या धुंदीत आपण काय करत आहोत, हे त्यांना समजत नव्हते आणि कोठे कोठे पळायचे हे पोलिसांना समजत नव्हते.
- साखर कारखाना चौकातही हाणामारी
पाचव्या दिवसाच्या विसर्जनावेळी देखावा पाहण्यासाठी साखर कारखाना चौकात गर्दी झाली होती. यावेळी दोन गटात वाद झाला. यानंतर एका गटाने गाडी भरून तरूण आणले. मात्र यावेळी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. यामुळे पुढील अनर्थ टळला.








