तालुक्यात कार्तिकी एकादशी भक्तिमय वातावरणात : विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम
वार्ताहर /किणये
तालुक्यात गुरुवारी कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध गावांमधील विठ्ठल- रखुमाई मंदिरांमध्ये काकडारती, भजन, प्रवचन, कीर्तन असे कार्यक्रम झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात अवघा तालुका दुमदुमला होता. काही गावातील बालकांनी कार्तिक एकादशीनिमित्त गावांमध्ये दिंड्याही काढल्या. पंढरीचा विठ्ठल हा लाखो वारकऱ्यांचे, वैष्णवांचे श्रद्धास्थान आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून लाखो भक्त पंढरपूरला गेले आहेत. त्यांनी डोळे भरून सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. कर्ले व अन्य काही गावातून गेल्या दहा-बारा दिवसापूर्वीच पायी दिंड्यांचे प्रस्थानही झाले. या दिंड्या बुधवारी सायंकाळी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाल्या. वारकरी ऊन थंडीची तमा न बाळगता विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग झाले होते. पंढरपूरला येण्याची व विठुरायाच्या दर्शनाची आम्हाला आस होती. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवला नाही या दिंडी सोहळ्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो. असेही काही वारकऱ्यांनी सांगितले.
गेल्या तीन चार दिवसापासून तालुक्याच्या विविध गावांमधील वारकरी खासगी टेम्पो, प्रवासी वाहने व रेल्वेमधून पंढरपूरला रवाना झाले. सध्या तालुक्यात सुगी हंगाम जोमाने सुरू आहे. भात कापणी, बटाटे व रताळी काढणी अशी कामे सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी सुगी हंगाम साधून एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपूरला जाणे पसंत केले. पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतले. तालुक्याच्या बहुतांश गावांतील विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये गुरुवारी कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष पूजा केली होती. या मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. गुरुवारी पहाटे मंदिरांमध्ये काकड आरती झाली त्यानंतर मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. दिवसभर भजन, हरिपाठ, प्रवचन असे कार्यक्रम झाले. काही मंदिरांमध्ये रात्री कीर्तन निरूपणाचे कार्यक्रम झाले.
किणये : गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात गुरुवारी पहाटे काकड आरती केली. ‘उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा’ असे अभंग म्हणत ‘ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा’ आदी अभंग वारकऱ्यांनी अगदी तल्लीन होऊन म्हटले’ काही मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मूर्ती, संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती, संत तुकाराम महाराज मूर्तीचे पूजन केले. दिवसभर मंदिरात विविध कार्यक्रम झाले. रात्री जागर भजनाचा कार्यक्रम झाला.
बेळगुंदी : गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात गुरुवारी आषाढी कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व झेंडूच्या फुलांची सजावट केली होती. पहाटे मंदिरात काकड आरती केली. विठ्ठल रखुमाई मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली. रात्री जागर भजन झाले.
खादरवाडी : गुरुवारी पहाटे काकडारती झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्माई मूर्तीचे पूजन, तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले. रात्री गावकऱ्यांतर्फे महाआरती करण्यात आली. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप केले. रात्री जागर भजन झाला. नावगे, वाघवडे, संतिबस्तवाड, झाडशहापूर, मच्छे, पिरनवाडी, रणकुंडये, बहाद्दरवाडी, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी , बामणवाडी, बाळगमट्टी, राकसकोप, इनामबडस, यळेबैल, सोनोली, बोकनूर, सावगाव, हंगरगा, मंडोळी आदी गावांमध्ये कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली. मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. वारकऱ्यांसह अनेक भक्तांनीही एकादशीचा उपवास भक्तिभावाने केला होता. बऱ्याच मंदिरांमध्ये गुरुवारी सायंकाळी दीपोत्सवाचे कार्यक्रम झाले .









