अध्याय एकोणतिसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, व्रत, तप, दान, योग, याग, ध्यान, वेदशास्त्राचे ज्ञान अशी कितीही साधने केली तरी ती माझ्या भक्तीशी स्पर्धा करू शकत नाहीत. हे लक्षात न आलेले साधक नाना साधने करून थकून जातात पण त्या साधनांना भक्त माझ्यावर करत असलेल्या प्रेमाची सर येत नाही. जेव्हा त्यांची माझ्या भक्ताशी गाठ पडते तेव्हाच त्यांना माझ्या भक्तीचे महात्म्य समजते. सर्व भूतांच्या ठिकाणी भगवद्भाव पाहणारा भक्त समोर कोणतीही व्यक्ती वा प्राणि आला तरी त्याच्यात माझेच रूप बघून तो त्याला दंडवत घालत असतो. त्याच्या मनात परिपूर्ण ब्रह्मभाव दाटून आला असल्याने तो कुणाबद्दल कटू भाव बाळगत नसतो. तो कुणाशीही कठोरपणे वागत नाही की कुणाला टाकून बोलत नाही. अगदी स्वत:चे प्राण जायची वेळ आली तरी समोर दिसणाऱ्या भूतांचे गुणदोष तो बोलून दाखवत नाही. तो स्वत: नुकसान सहन करतो आणि अपकार करणाऱ्यावरही उपकार करत असतो. हेच माझी भक्ती करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे हे माझे सज्ञान भक्त जाणून असतात. ज्याप्रमाणे लहान मुले एखादी गोष्ट सांगत असताना ती समोरच्या मुलाला खरी वाटावी म्हणून आईची शप्पथ घेऊन सांगतात, त्याप्रमाणे आपले सांगणे उद्धवाने पूर्णपणे खरे मानावे म्हणून भगवंतानी देवकीची म्हणजे त्यांच्या आईची शप्पथ घेतली आणि म्हणाले, उद्धवा मी सांगतोय हेच ब्रह्मप्राप्तीचे सुगम साधन आहे आणि ते कुणालाही करणे सहज शक्य आहे कारण ह्यात अन्य कुणाची मदत लागत नाही की पैसा लागत नाही. उद्धवा माझे भजन करणे हे साधन अतिशुद्ध आहे. ह्यात थोडीसुद्धा विघ्नांची बाधा होऊ शकत नाही. कसं ते तुला समजावून सांगतो. जगात अनेक धर्म आहेत आणि त्यावरील शास्त्रार्थ सांगणारेही भरपूर आहेत. असं जरी असलं तरी ज्यांनी शास्त्रार्थ सांगितला म्हणजे तो त्यांनी जीवनात अंमलात आणला असेल असे नाही म्हणून माझी मी वर सांगितल्याप्रमाणे भक्ती करणे हे सर्वश्रेष्ठ आहे. ह्या भक्तीचे श्रेष्ठपण असं की, भक्ताने अशाप्रकारची भक्ती करायची ठरवली की, त्या भक्तापाशी अल्पसेसुद्धा विघ्न फिरकू शकत नाही मग ते त्याला बाधणे ही फार दूरची गोष्ट झाली. जेव्हा भक्त एखाद्या अपेक्षेने माझी भक्ती करू लागतो तेव्हा त्यात येणाऱ्या अडचणी विघ्नांच्यारूपाने पुढे उभ्या राहतात पण जो माझी निरपेक्ष भक्ती करतो त्याला येणाऱ्या विघ्नांचा नाश मी स्वत:च करत असतो. ज्याप्रमाणे गरुडाने झडप घातल्या घातल्या सापाची खांडोळी होते. त्याप्रमाणे माझ्या निरपेक्ष भक्ताजवळ येणारी विघ्ने जळून भस्म होतात. माझ्या नामापुढे विघ्न उभेच राहू शकत नाही मग ते माझी भक्ती करणाऱ्याकडे कोणत्या तोंडाने येईल? उद्धवा तुझे भाग्य थोर आहे म्हणून मी माझ्या जिव्हाळ्याची गोष्ट तुला सांगितली. हे माझे सांगणे साराचे सर आहे असे समज. जो माझी निष्काम भक्ती करेल त्याला विघ्नांच्या गुंत्यात पडून राहावे लागत नाही. अशा भक्तापुढे परब्रह्माची ब्रह्मस्थिती हात जोडून उभी राहते कारण ती त्याच्या हक्काची असते. त्यासाठी कोणत्याही हेतुशिवाय कर्म करावे आणि ते मला अर्पण करावे हेच माझ्या भक्तीचे उत्तम लक्षण आहे. पूजापाठ, यज्ञयाग, ध्यानधारणा, मंत्रपठण, वेदाभ्यास अशी भक्तीच्या अन्य साधने करणाऱ्यांपेक्षा माझी निरपेक्ष भक्ती करणारा भक्त मला अधिक प्रिय आहे. आता ह्या भक्तीचे स्वरूप कसे असते ते सांगतो. मनुष्य व्यवहारात यशस्वी होण्याच्या अपेक्षेने जो प्रयास करत असतो त्यात यश मिळालं तर ठीक अन्यथा तो वाया जातो पण जर माणसाने प्रयास करून ते माझ्या चरणी अर्पण केले आणि त्यातील यशापयशाची जबाबदारी माझ्यावर सोपवली तर तो माझ्या भजनी लागला असे होते. म्हणून प्रत्येक कृती करून माझ्या चरणी अर्पण करण्यातच माणसाचे भले आहे कारण त्याची ती कृती माझी भक्ती करण्यामध्ये जमा होते.
क्रमश:








