सातारा :
ऐतिहासिक अशा बावधन गावात गेली एक महिनाभरापासून सुरु झालेल्या बगाड यात्रेच्या सोहळ्याचा बुधवारी मुख्य दिवस होता. पहाटेपासूनच गावात लगबग सुरु होती. मध्यरात्री वाजतगाजत गावातून देवाचा छबिना पार पडला. सकाळच्या प्रहरी सोनेश्वर या पवित्र ठिकाणी भैरवनाथाची व ग्रामदैवतांची पूजा करुन बगाडाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही बगाड मिरवणूक काशिनाथाचं चांगभलंचा जयघोष करत गुलालाची उधळण करत गावाच्या दिशेने निघाली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बगाडाच्या रथाची चाके शेतात रुतली तरीही बगाडाची मिरवणूक शांततेत मोठ्या उत्साही वातावरणात गावात पोहोचली. या बगाड यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.
वाई तालुक्यातील बावधन या गावाच्या बगाड यात्रेची परंपरा इतिहास काळापासून असल्याचे तेथील ग्रामस्थ सांगतात. त्यानुसार यावर्षीही बगाड यात्रेचा सोहळा हा गेली एक महिन्यापासून सुरु आहे. त्या यात्रेचा बुधवार मुख्य दिवस होता. रात्री गावातून देवाचा छबिना पार पडला. पालखीतून देवाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पहाटेच श्री क्षेत्र सोनेश्वर कृष्णा नदी काठी गावातील मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ, भक्त, बगाड्या अजित ननावरे अशा सर्वांच्या उपस्थितीत पुरोहितांच्या हस्ते मंत्र उच्चारात ग्रामदेवतांची आणि भैरवनाथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर अकरा वाजता बगाड जुंपण्यात आले. उन्हाचा पारा चढत होता. तरीही पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर गुलाबी रंगाचा रंग असलेल्या कपड्यातले गावकरी काशिनाथाचं चांगभलं करत होते. बगाडाच्या मागे वाजतगाजत ग्रामदैवताच्या पालख्या होत्या. एका वेळी किमान दहा जे बारा बैल बगाडाच्या रथास जुंपण्यात आले होते. बैलांना सावरत शिवारातील किमान पाचशे बैलाच्यामदतीने बगाड ओढून गावाच्या दिशेने आणले जात होते. बावधन गावात बगाड येईपर्यंत शिवाराप्रमाणे बैल जोडा बदलण्यात येत होते. मानाप्रमाणे बैल जुपत होते आणि लगेच बैल बाजूला घेत होते. त्यातच बगाड बघण्यासाठी आलेल्यांचीही स्वत:ला वाचवत, बैल आपल्याकडे तर येत नाही ना या भितीपोटी बगाड बघत दंग होते.
- बगाडाची चाके रुतली तरीही..
बगाड गावात पोहोचेपर्यंत प्रत्येक मानकऱ्यांची नजर बैलावर आणि बगाडावर असते. कुठेही काही अडचण निर्माण होवू नये याची त्यांच्याकडून दक्षता घेतली जात होती. याच दरम्यान, दुपारी 1 वाजता शेतात बगाडाची चाके रुतली. शीडही थोडे कलले होते. त्यामुळे शीड खाली उतरविण्यात आले. दुपारी दोन वाजता शेड पुन्हा बघाडावर चढवून मिरवणुकीला काशिनाथाच्या नावानं चांगभलं घालत सुरू झाली. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान बगाड शेतशिवारातून पक्क्या रस्त्यावर आले. नंतर ते वाई सातारा रस्त्यावर आले आणि रात्री आठच्या दरम्यान बावधन गावात पोहोचले.
- पहाटे जननी मातेला बगाड जाणार
बगाडाची मिरवणूक ही गावात पोहोचल्यानंतर गुरुवारी सकाळी जननी मातेची भेट घेण्यासाठी बगाड जाते. गावातील विद्युत तारांचा अडथळा पार करत बगाड मिरवणूक ही जननी माता मंदिर परिसरात पोहोचले. तेथील स्थानिक या बगाड मिरवणुकीचे स्वागत करतात. यावर्षी बगाड मिरवणुकीनिमित्त गावकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले होते. आज किमान तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी बगाडाचे दर्शन घेतले. रस्त्याला खाऊ गल्लीचे स्वरूप आले होते.
- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमोल गवळी, बिपिन चव्हाण, सुधीर वाळुंज यांच्यासह आठ पोलीस अधिकारी, दंगाविरोधी पथक असे शंभरावर पोलीस बळ यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी तैनात करण्यात आले होते. कुठेही अनुचित प्रकार वाई पोलीस आणि भुईंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे घडला नाही.
- ओझर्डे येथील सोंगे महोत्सवही उत्साहात
बावधनलगतच असलेल्या ओझर्डे या गावात पहाटेच्या सुमारास सोंगे महोत्सव पार पडला. हा महोत्सव सुध्दा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. साळ आणि आणि माळ यांच्यावतीने सोंगाची मिरवणूक काढून पद्मवती मंदिरापर्यंत ही सोगांची मिरवणूक काढण्यात आली. विविध प्रकारची सोंगे वटवण्यात आली होती. गावातील तरुणांनी ही सोंगे केली होती..








