सोमवारच्या दौडला शेकडोंची उपस्थिती : नेहमीच्या मार्गांबरोबर नव्या मार्गावर दुर्गामाता दौड
बेळगाव : तरुणांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासोबत धर्मरक्षणाचे कार्य दुर्गामाता दौडमधून केले जाते. त्यामुळेच दररोज शेकडो शिवभक्त दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होऊन देव, देश आणि धर्माविषयीचे आपले प्रेम दाखवून देत असतात. सोमवारी झालेल्या आठव्या दिवशीच्या दौडवेळी उपस्थिती लक्षणीय होती. व्यसनाधिनतेकडे वळलेल्या तरुणाईला पुन्हा समाज व धर्मकार्याकडे आणण्यासाठी दुर्गामाता दौड महत्त्वाची ठरत आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने आयोजित आठव्या दिवशीच्या दौडला छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून सुरुवात झाली. यावर्षी नवरात्रोत्सवाचे 11 दिवस असल्याने नेहमीच्या मार्गांबरोबर या नव्या मार्गावर दुर्गामाता दौड काढण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. धारकरी गणेश जांगळे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणामंत्र म्हणून दौडला सुरुवात झाली.
एसपीएम रोड, हेमुकलानी चौक, रामलिंगखिंड गल्ली या परिसरात दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित दौडच्या सांगता समारंभाला उपस्थित होते. धर्मवीर संभाजी चौक येथे दौडची सांगता झाली. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. शेकडोंच्या संख्येने धारकरी व शिवभक्त सहभागी झाले होते.
स्वराज्यातील शिलेदारांच्या वंशजांची उपस्थिती
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ताशिलदार गल्ली विभागातल्या दौडीमध्ये हिंदवी स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या शिलेदारांचे वंशज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वडील श्रीमंतराजे लखोजीराव जाधव, सिंदखेड राजा यांचे थेट 16 वे वंशज श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव बुधवार दि. 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दौडमध्ये सहभागी होणार आहेत.
दौडीचा मार्ग
बुधवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सोमनाथ मंदिरापासून सुरुवात होऊन फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनि मंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, रिझ टाकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदुर गल्ली, फुलबाग गल्ली (उषाताई गोगटे हायस्कूल), स्टेशन रोडमार्गे शनि मंदिरात सांगता होणार आहे.









