माहिती-प्रसारण मंत्रालयाकडून दिशानिर्देश ः हिंसक व्हिडिओचे एडिटिंग होत नसल्याची तक्रार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘रक्तपाता’शी निगडित दृश्य दाखविणाऱया सर्व टीव्ही वाहिन्यांना माहिती-प्रसारण मंत्रालयाने फटकारले आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयाने सोमवारी टीव्ही वाहिन्यांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. या दिशानिर्देशात रस्ते दुर्घटना, मृत्यू, हिंसा, महिलेविरोधातील हिंसा तसेच वृद्ध आणि मुलांविरोधातील हिंसेला विशेष करून सामील करण्यात आले आहे. वाहिन्यांवर बारकाईने नजर ठेवल्यावर हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. वाहिन्यांनी कुठलाही विचार न करता हिंसक दृश्ये प्रसारित केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
टीव्ही वाहिन्यांनी लोकांच्या मृत्यूची छायाचित्रे-चित्रफिती दाखविल्या, रक्ताने माखलेल्या जखमी व्यक्तीला दाखविले, महिला अन् वृद्ध तसेच मुलांना मारहाण करतानाचे व्हिडिओ दाखविण्यात आले, शिक्षकाकडून मारले जात असताना मुलांचे विव्हळणे दाखविले गेले, ही सर्व दृश्ये वारंवार दाखविण्यात आली. तसेच वाहिन्यांनी या दृश्यांना अधिक हिंसक दर्शविण्यासाठी त्यावर गोलाकृती चिन्हही तयार केल्याचे माहिती-प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.
हिंसक दृश्यांना ब्लर करण्यात यावे किंवा त्यांचे लाँग शॉट दाखविण्यात यावेत ही काळजी वाहिन्यांनी घेतली नाही. या घटनांचे वृत्तांकन वाहिन्यांकडून चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. या दृश्यांनी प्रेक्षकांना विचलित केले आहे. रक्ताने माखलेल्या अवस्थेतील छायाचित्रे, मृतदेह, शारीरिक छळाची दृश्ये प्रोग्राम कोडनुसार नाहीत. हिंसक व्हिडिओ तसेच छायाचित्रे वाहिन्यांकडून सोशल मीडियावर जारी करण्यात येत असून ती एडिट देखील केली जात नसल्याने मुलांवर मनोवैज्ञानिक प्रभाव पडत आहे. तसेच यामुळे व्यक्तीच्या खासगीत्वाचे उल्लंघन देखील होत असल्याचे दिशानिर्देशात म्हटले गेले आहे.
माहिती-प्रसारण मंत्रालयाने त्रासदायक फुटेज आणि छायाचित्रांच्या प्रसारणाच्या विरोधात टीव्ही वाहिन्यांना सतर्क केले आहे. प्रोग्राम कोडचे उल्लंघन करत रक्त, मृतदेह आणि शारीरिक हल्ल्याची छायाचित्रे दर्शविण्यात आली आहेत. वाहिन्यांकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणाऱया हिंसक व्हिडिओचे कुठलेच एडिटिंग करण्यात येत नसल्याने महिला आणि मुलांवर वाईट प्रभाव पडत असल्याचे मंत्रालयाने नमूद पेले आहे.
माहिती-प्रसारण मंत्रालयाने दिली उदाहरणे..
-30 डिसेंबर रोजी एका क्रिकेटपटूची विचलित करणारी छायाचित्रे ब्लर न करता प्रसारित करण्यात आली.
-28 डिसेंबर रोजी एक व्यक्ती मृतदेहाला खेचत असल्याचे आणि त्यादरम्यान पीडिताचा चेहरा अन् आसपास रक्ताचा थारोळा असल्याचे दाखविण्यात आले.
-6 जुलै रोजी एक शिक्षक 5 वर्षीय मुलाला मारहाण करत असल्याचे दाखाविण्यात आली, ही क्लिप म्यूट न करता प्रसारित करण्यात आली.
-4 जून रोजी पंजाबी गायकाचा रक्ताने माखलेला मृतदेह ब्लर न करता वाहिन्यांवर दाखविण्यात आला.









