वार्ताहर / काकती
राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवरील पहिल्या प्रवेशद्वाराजवळ बैलहोंगल येथून आलेल्या राणी चन्नम्मा ज्योती यात्रा रथाचे काकती ग्रामस्थांतर्फे जयघोषात स्वागत करण्यात आले.
सोमवारी सकाळी भावकाई गल्ली प्रवेशद्वारानजीक राणी चन्नम्मा ज्योती यात्रा रथाचे आगमन झाले. काकती ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार, काकतीचे पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, पीडीओ अरुण नाईक, उपतहसीलदार एस. जे. साळुंखे आदींनी रथयात्रेतील ज्योतीला पुष्पहार घालून स्वागत केले. सुवासिनींनी ज्योतीची आरती केली.
राज्य सरकारच्या आदेशानुसार कित्तूर उत्सव 23 ऑक्टोबरपासून तीन दिवस राज्यस्तरीय उत्सव म्हणून साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कित्तूर चन्नम्मा ज्योती यात्रा रथाचे आगमन झाले. वाद्यवृंदाच्या निनादात देसाई गल्ली येथील राणी चन्नम्मा स्मारक आणि श्री सिद्धेश्वर देवस्थानात ज्योती रथाचे पुष्पहार घालून विविध सेवाभावी संघटना व मान्यवरांच्यावतीने पूजन करण्यात आले.
यावेळी ता. पं. माजी सदस्य यल्लाप्पा कोळेकर, मंजू इंचल, देवस्थान पंच मंडळ, अंगणवाडी साहाय्यिका, आशा सेविका, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.