दुपदरीकरणाच्या कामाचा परिणाम, प्रवाशांचे हाल
बेळगाव : बेंगळूर ते मिरज दरम्यान धावणारी चन्नम्मा एक्स्प्रेस सोमवारी तब्बल चार तास उशिराने बेळगावमध्ये दाखल झाली. हुबळी ते कुंदगोळ यादरम्यान सुरू असणाऱ्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण कामामुळे रेल्वे उशिराने दाखल झाली. परंतु या सर्वांमध्ये रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांना घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही चार तास रेल्वेस्थानकात ताटकळत थांबावे लागले. नैर्त्रुत्य रेल्वेच्या अखत्यारित हुबळी दक्षिण ते कुंदगोळ यादरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. यामुळे दक्षिण कर्नाटकातून हुबळीकडे येणाऱ्या एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. याचा फटका बेळगाव, सांगली, मिरज येथील प्रवाशांनाही बसला. दररोज सकाळी 8.50 वा. बेळगावला येणारी चन्नम्मा एक्स्प्रेस सोमवारी मात्र दुपारी 12.50 वा. दाखल झाली. चार तास उशीर झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता.
नोकरदारवर्गाची तारेवरची कसरत
विकेंडची सुटी असल्याने शनिवार, रविवार अनेक नोकरदार गावी परतले होते. नेहमीप्रमाणे चन्नम्मा एक्स्प्रेसने येऊन सकाळी कामावर दाखल होण्याचा त्यांचा प्लॅन होता. परंतु एक्स्प्रेस चार तास उशिरा आल्याने त्यांना वेळेवर कामावर पोहोचता आले नाही. लहान मुलांचेही यादरम्यान बरेच हाल झाले.चन्नम्मा एक्स्प्रेसला उशीर होणार हे याआधी जाहीर केले असते तर प्रवाशांची गैरसोय झाली नसती.









