पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दि. 4 रोजी गोवा दौऱ्यावर येत असून या भेटीनिमित्त दाबोळी विमानतळ ते कार्यक्रम ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमर्यंतच्या रस्ता वाहतुकीत अनेक बदल केले आहेत. त्यासंबंधी वाहतूक अधीक्षकांकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच एखादा केंद्रीय गृहमंत्री दाबोळीतील ‘आयएनएस हंस’ या हवाई दलाच्या विमानतळावर उतरणार आहे. तेथून ते चिखली मार्गे नवीन झुआरी पुलावरून बांबोळी येथे गोमेकॉकडून गोवा विद्यापीठ मार्गाने मुखर्जी स्टेडियमकडे पोहोचणार आहेत. त्यामुळे आज सायंकाळपासून सदर रस्ता सामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधित वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे, बंदी घातलेल्या मार्गावर वाहने थांबवू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
- चिखली-नवीन झुआरी पुल-बांबोळी गोमेकॉ-गोवा विद्यापीठ ते मुखर्जी स्टेडियमपर्यंतचा रस्ता आज सांयकाळपासून बंद राहील.
- या मार्गावरील वाहने सर्व्हिस रोडने वळविण्यात येणार आहेत.
- दक्षिण गोव्यातील बसेस आणि अन्य वाहने गोमेकॉ, गोवा विद्यापीठमार्गे वळविण्यात येतील.
- वाहनांचे पार्किंग स्टेडियमजवळील निर्धारित ठिकाणी, अर्थात गोवा विद्यापीठ क्रिकेट मैदान, आयटी हॅबिटॅट आणि अन्य नियुक्त ठिकाणी होणार आहे.
- उत्तर गोव्यातील बसेस गोमेकॉ अंडरपास आणि गोवा विद्यापीठ मार्गे त्यांच्या निर्धारित पार्किंग ठिकाणी जातील.
- अन्य वाहने पणजी शहर किंवा जीएमसी अंडरपासमधून प्रवास करू शकतील.









