बॉयप्रेंड लूपहोलही संपविला जाणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत मागील महिन्यात झालेल्या सामूहिक गोळीबारानंतर बंदूक हिंसेवर आळा घालण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. याचदरम्यान सिनेटने बंदूक कायद्यांमध्ये बदलाशी संबंधित एका प्रस्तावाची घोषणा केली आहे. कायद्यातील सुधारणांच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
बंदूक कायद्यांमधील दुरुस्तीत बॉयप्रेंड लूपहोललाही सामील करण्यात आले आहे. बॉयप्रेंड लूपहोलसंबंधी नियम तयार करण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. अमेरिकेच्या बंदूक कायद्यांनुसार घरगुती हिंसा करणाऱयांना बंदूक मिळत नाही, अशा व्यक्तींकडे बंदूक असल्यास ती जप्त केली जाते. परंतु हा नियम केवळ विवाहित लोकांवरच लागू होताहे.
सध्या केवळ डेट करत असलेले लोक बॉयप्रेंड लूपहोलमुळे वाचत होते. अमेरिकेच्या संस्कृतीत जोडपे विवाह न करता दीर्घकाळापर्यंत एकत्र राहते. अनेकदा अशा जोडप्यांमध्ये भांडण होतात आणि महिला घरगुती हिंसेची शिकार ठरते. बॉयप्रेंड आणि पतीकडून करण्यात आलेली घरगुती हिंसा सारखीच असते. परंतु बंदूक केवळ पतीची जप्त होते. प्रियकराकडील शस्त्र मात्र जप्त करण्यात येत नाही. नियमातील याच त्रुटीला बॉयप्रेंड लूपहोल नाव देण्यात आले आहे.
बिडेन यांच्याकडून स्वागत
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असून यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेली बंदूक हिंसा रोखण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे. आवश्यक असलेले सर्वकाही या प्रस्तावात नाही, परंतु योग्य दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडत असल्याचे हा प्रस्ताव दर्शवितो. या दशकांमध्ये काँग्रेसकडून संमत सर्वात महत्त्वपूर्ण बंदूक सुरक्षा कायदा असणार आहे असे उद्गार त्यांनी काढले आहेत.









