अवजड वाहनांना दुपारी 2 पासून प्रवेशबंदी
बेळगाव : शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली असून शनिवारी दुपारी 2 पासून दुसऱ्या दिवशी रविवारी मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असणार आहे. नरगुंदकर भावे चौकपासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमूकलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, रेणुका हॉटेल क्रॉसवरून कपिलेश्वर तलावाजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर किल्ला तलाव, सम्राट अशोक चौक, आरटीओ सर्कल, राणी चन्नम्मा सर्कलमार्गे कॉलेज रोडकडे जाणारी वाहने संगोळ्ळी रायण्णा सर्कलपासून एस. पी. ऑफिसमार्गे कोल्हापूर सर्कल, वाय जंक्शन, सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर बाची क्रॉस,महात्मा गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक (मिलिटरी इस्पितळ सर्कल), केंद्रीय विद्यालय नंबर 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटर मार्गे खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहेत. खानापूर रोडवरून चन्नम्मा सर्कलकडे येणारी वाहतूक याच मार्गावरून हिंडलगा गणेश मंदिर, हनुमाननगर डबल रोडवरून बॉक्साईट रोडवर वळविण्यात येणार आहे.
गोगटे सर्कलहून रेल्वेस्टेशन, हेडपोस्ट ऑफिस सर्कल मार्गे शनिमंदिराकडे जाणारी वाहतूक गोवावेस, नाथ पै सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्ली मार्गे वळविण्यात येणार आहे. नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक खासबाग बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्ली रोडवरून वळविण्यात येणार आहे. जिजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, कांबळी खूट, पिंपळकट्टा, पाटील गल्ली मार्गे जाणारी वाहतूक जिजामाता सर्कलहून थेट मध्यवर्ती बसस्थानक किंवा पॅटसन शोरुमकडे जुन्या पी. बी. रोडवर वळविण्यात येणार आहे.
जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टिक, भातकांडे स्कूल मार्गे कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक संभाजी रोडवरून बसवेश्वर सर्कल खासबाग, नाथ पै सर्कलकडे तर जुना पी. बी. रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिरकडे जाणारी वाहतूक यश हॉस्पिटलजवळ डाव्या मार्गावर वळवून व्हीआरएल लॉजिस्टिकजवळून जुन्या पी. बी. रोडवर वळविण्यात येणार आहे. गुड्सशेड रोडवरून कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे येणारी वाहने एसपीएम रोडकडे न येता मराठा मंदिर, गोवावेस सर्कलकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर जिथे दोन रस्ते आहेत, यापैकी एक मिरवणुकीसाठी तर दुसरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे. एकच रस्ता असलेल्या ठिकाणी तो केवळ मिरवणुकीसाठी असणार आहे. शनिवारी दुपारी 2 पासून मिरवणूक संपेपर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असणार आहे. चन्नम्मा सर्कलपासून संपूर्ण मिरवणूक मार्गावर शनिवारी दुपारी 2 पासूनच मिरवणूक संपेपर्यंत वाहने उभी करण्यास बंदी असणार आहे.









