रहदारीवर निर्बंध; घातक वस्तूंवर प्रतिबंध : अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीही नियम कडक : विविध ठिकाणी वाहने पार्किंग करण्याची सूचना

बेळगाव : शनिवार दि. 13 मे रोजी टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेजमध्ये होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गोवावेस सर्कल ते अनगोळ क्रॉसपर्यंत खानापूर रोडवर दुतर्फा वाहने उभी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तर गोवावेस सर्कलपासून आरपीडीकडे जाणारी वाहतूकही इतरत्र वळविण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 7 ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गोवावेस, आरपीडी रोड, गुरुदेव रानडे रोड, पहिले, दुसरे व तिसरे रेल्वेगेट, अनगोळ रोड, भाग्यनगर परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
- गोवावेसहून आरपीडी सर्कलकडे जाणारी वाहने महावीर भवनजवळ वळविण्यात येणार आहेत. गुरुदेव रानडे रोड, भगतसिंग गार्डनमार्गे आदर्शनगर, वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याहून भाग्यनगर दहाव्या क्रॉसमार्गे अनगोळ हरिमंदिरकडे वळविण्यात येणार आहेत.
- तिसऱ्या रेल्वेगेटपासून गोवावेस सर्कलकडे जाणारी वाहतूक अनगोळ क्रॉस, इंडियन ऑईल पेट्रोल पंपमार्गे दुसऱ्या रेल्वेगेटवरून काँग्रेस रोडवर वळविण्यात येणार आहे.
- शहापूरहून येणारी वाहतूक गोवावेस सर्कलपासून उजव्या बाजूला वळवून महात्मा फुले रोड, कपिलेश्वर उ•ाणपूल, शनिमंदिर मार्गे जुन्या पी. बी. रोडवर वळविण्यात येणार आहे.
- मतमोजणी केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांसाठी भाग्यनगर दुसरा क्रॉसवरून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीजवळ डाव्या बाजूने वळून आमराई प्रवेशद्वारातून आरपीडी कॉलेज मैदानात वाहने उभी करण्याची सोय करण्यात आली आहे.
- उमेदवारांनी आरपीडी कॉलेजच्या पहिल्या गेटमधून प्रवेश करायचा आहे. आपली वाहने केएलएस इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानात उभी करायची आहेत. मतमोजणी एजंटांनी गोमटेश हायस्कूल, हिंदवाडी येथील मैदानात वाहने उभी करून तेथून चालत मतमोजणी केंद्रात यायचे आहे.
- मतमोजणीसाठी वेगवेगळ्या तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे. निपाणी, चिकोडी, सदलगा, रायबाग, कुडचीहून येणारी वाहने गोवावेस सर्कलहून रेल्वेस्टेशनपासून मराठा मंदिरपर्यंतच्या रस्त्याशेजारी उभी करायची आहेत.
- अथणी, कागवाड, गोकाक, अरभावी, हुक्केरी, यमकनमर्डी परिसरातून येणारी वाहने लेले मैदान व व्हॅक्सिन डेपो मैदानात उभी करायची आहेत. बैलहोंगल, कित्तूर, रामदुर्ग, सौंदत्ती परिसरातून येणारी वाहने जुन्या पी. बी. रोडवरून नाथ पै सर्कलमार्गे येऊन बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या डाव्या बाजूला आदर्शनगर येथील शाळेच्या मैदानावर किंवा रस्त्याशेजारी उभी करायची आहेत.
- खानापूर, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून येणारी वाहने तिसऱ्या रेल्वेगेटपासून पिरनवाडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभी करायची आहेत.
निर्बंधित वस्तू आणण्यास प्रतिबंध…
मतमोजणी केंद्रावर येणारे अधिकारी, कर्मचारी व एजंटांनी आपल्यासोबत मोबाईल, पानमसाला, गुटखा, शाईचे पेन, कॅमेरा, माचीस, लायटर, प्लास्टिकच्या वस्तू किंवा इतर प्रतिबंधित वस्तू सोबत आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी पत्रकाद्वारे दिली आहे.









