वृत्तसंस्था / कोलकाता
भारतीय क्रिकेट क्षेत्रात प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामाध्ये विविध राष्ट्रीय स्पर्धा विशिष्ट स्वरुपात नियमीतपणे घेतल्या जातात. मात्र आता प्रसिद्ध असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या स्वरुपात बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीने शनिवारी येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे. दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा आता आंतरविभागीय पद्धतीने खेळविली जाणार आहे. हा बदल केवळ एक वर्षांसाठी राहिल.
गेल्या वर्षी अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय निवड समितीने संघ निवड करताना रणजी क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. आता पुढील वर्षी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या स्वरुपात होणाऱ्या फेरबदलानुसार एकूण 38 संघांचा समावेश राहिल. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य, उत्तर-पूर्व अशा सहा विभागात हे संघ विभागण्यात येतील. यापूर्वी चॅलेंजर करंडक स्पर्धेत अ, ब, क, ड अशा गटामध्ये संघ विभागले जात असत. 1961-62 ते 2014-15 या कालावधीत दुलीप करंडक प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा आंतरविभागीय पद्धतीनुसार खेळविली गेली होती. त्यानंतर 2015 साली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख पद राहुल द्रविडकडे आल्यानंतर त्याने चॅलेंजर करंडक स्पर्धेप्रमाणे दुलीप करंडक स्पर्धा खेळविली जावी, असा सल्ला राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीला दिला होता. त्यानंतर चॅलेंजर करंडक स्पर्धेत इंडिया ब्ल्यु, इंडिया रेड, इंडिया ग्रीन अशी नवी नावे संघांना देण्यात आली होती. चॅलेंजर करंडक स्पर्धा या नव्या स्वरुपात 2019 पर्यंत खेळविली गेली. दरम्यान कोरोनाची समस्या निर्माण झाल्यानंतर 2020 आणि 2021 साली दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर 2022 आणि 2023 साली दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे पुनरागमन विभागीय स्पर्धा म्हणून झाले. 2024 साली या स्पर्धेच्या स्वरुपात बदल करण्याचा निर्णय राष्ट्रीय निवड समितीने घेतला आहे.
देशात होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वनडे आणि टी-20 प्रकारातील क्रिकेट स्पर्धा आता इलाईट आणि प्लेट अशा नव्या पद्धतीने यापुढे खेळविल्या जाणार आहेत. पूर्वी प्रमाणेच या स्पर्धांमध्ये पुरुष विभागात 38 तर महिलांच्या विभागात 37 संघांचा समावेश राहिल. 2025-26 क्रिकेट हंगामापासून सय्यद मुस्ताकअली करंडक क्रिकेट स्पर्धा तसेच विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा रणजी स्पर्धेप्रमाणे प्लेट आणि इलाईट अशा दोन विभागात खेळविली जाणार आहे. सदर निर्णय बीसीसीआयच्या कारकारिणी समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.









