विशिष्ट प्रकारच्या स्थितीत मिळणार 60 दिवसांची रजा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने मातृत्व रजेसंबंधी (मॅटर्निटी लिव्ह) नवा आदेश जारी केला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्व महिला कर्मचाऱयांना प्रसूतीनंतर नवजाताचा मृत्यू झाल्यास 60 दिवसांची विशेष मातृत्व रजा देण्यात येणार आहे. अपत्य मृत जन्माला आल्यास किंवा जन्मानंतर त्वरित नवजाताचा मृत्यू झाल्यास मातेला बसणारा भावनात्मक धक्का विचारात घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले गेले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत या मुद्दय़ावर विचारविनिमय करण्यात आला आहे. नवजाताच्या मृत्यूनंतर संबंधित महिलेला बसणारा धक्का विचारात घेत केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱयांना अशा स्थितीत 60 दिवसांची मातृत्व रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हटले आहे. प्रसूतीनंतरच्या 28 दिवसांमध्ये नवजाताचा मृत्यू झाल्यास ही तरतूद लागू होणार आहे.









