पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या तुकाराम पगडीवरील ओवीमध्ये आता बदल करण्यात आला असून, “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” या ओवीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार तुकाराम पगडी तयार करण्यात आली. मात्र, त्या पगडीवर समोरच्या बाजूला मध्यभागी लिहिण्यात आलेली ओवी आता बदलण्यात आली आहे. आधी या पगडीवर “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी” ही तुकाराम महाराजांची ओवी लिहिण्यात आली होती. आता या पगडीवरील ओवी बदलण्यात आली असून त्यावर “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” ही ओवी लिहिण्यात आली आहे. आता हीच पगडी उद्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे. आधीच्या ओवी अधिक समर्पक वाटत नाहीत, असे काहींचे म्हणणे होते. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.








