डॉ. गोविंद काजरेकर यांचे प्रतिपादन : मराठी शिक्षक शिबिराची उत्साहात सांगता
बेळगाव : अतिप्राचीन काळापासून मराठी भाषेत शब्द प्रवाहित झाले असून त्या शब्दांमुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. भाषा ही काळानुरुप बदलत गेली आहे. त्यामुळेच तिला नवसंजीवनी आणि उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. ज्ञानेश्वरांच्या काळापासून मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे, असे प्रतिपादन बांदा येथील प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, मराठी भाषा साहित्य व संस्कृती संवर्धन प्रसार केंद्रातर्फे बुधवारी मराठी भाषा शिक्षक शिबिर आरपीडी महाविद्यालयात उत्साहात पार पडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर होते. व्यासपीठावर लेखिका अद्वैता उमराणीकर, डॉ. शोभा नाईक उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. शोभा नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आरसीयूच्या मराठी विभागातर्फे डॉ. मनीषा नेसरकर, प्रा. मैजुद्दीन मुतवल्ली यांच्या हस्ते डॉ. किरण ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. गोविंद काजरेकर पुढे म्हणाले, तब्बल 2000 वर्षांचा कालखंड मराठी भाषेला लाभला आहे. रामायण, महाभारतातून काही शब्द मराठी भाषेत आले असून संतांनी ही भाषा वृद्धिंगत केली आहे. पुढे तज्ञांनी समृद्धता निर्माण केली. त्यामध्ये गद्य आणि पद्य निर्माण केले. तेथून भाषा अधिक समृद्ध झाली, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. किरण ठाकुर म्हणाले, मराठी समृद्ध व श्रीमंत झाली पाहिजे, यासाठीच सर्वांचा अट्टहास आहे. मराठी भाषेच्या संस्कृतीविषयी जिव्हाळा असलेले 15 ते 20 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. म्हणूनच महाभारत, रामायण आणि ज्ञानेश्वरी आपल्याला मराठीतून शिकायला मिळाली. सीमाभागात हिंदी प्रचार सभा ज्याप्रमाणे चालते, त्या धर्तीवरच मराठी प्रचार सभा सुरू होणार आहे.
बेळगाव तालुक्यासह निपाणी, खानापूर तालुक्यात हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. यामध्ये मुलांना आत्मविश्वासाबाबत धडे दिले जाणार आहेत. यासाठी बाल भारतीच्या पुस्तकांची छपाई केली आहे. आरपीडी महाविद्यालयात यासाठी केंद्र सुरू होत आहे. लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी बडबड गीतांबरोबर इतर पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. किरण ठाकुर यांनी केले.
अद्वैता उमराणीकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील भाषा नि:संकोचपणे आपण स्वीकारायला हवी. यातूनच भाषेला अधिक समृद्धता येते. खऱ्या शिक्षणाला शाळेपासून सुरुवात होते. शाळेमध्ये मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कारांचे धडे मिळायला हवेत. मराठी शिक्षकांबरोबर इतर विषयांच्या शिक्षकांनी प्रथमत: मराठी भाषा समजून घेतली पाहिजे. त्यामुळे पुढील अध्यापन सुरळीतपणे चालते, असे सांगून त्यांनी जपान येथे भेट दिलेल्या काही प्राथमिक शाळांची उदाहरणे देऊन मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रेया सव्वाशेरी, गिरीषा पाटील व राणी लोहार यांनी केले. रांगोळी गीतांजली सोमाईचे यांनी रेखाटली होती. प्रा. परसू गावडे यांनी आभार मानले. लेखक भेट या शेवटच्या सत्रामध्ये अनंत मनोहर यांच्या साहित्यपर मेधा मराठे, अर्चना ताम्हणकर व आरती आपटे यांनी अभिवाचन केले.









