वृत्तसंस्था/ कोलंबो
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. येथे टीम इंडिया तीन टी 20 व तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. मात्र, त्यात शनिवारी बदल करण्यात आला आहे. भारताचा श्रीलंका दौरा 26 जुलै ऐवजी 27 जुलैपासून सुरु होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 27 जुलैपासून टी 20 मालिका सुरु होईल दुसरा सामना 28 जुलै ऐवजी 29 जुलै आणि तिसरा सामना 29 जुलै ऐवजी 30 जुलैला खेळवला जाईल. टी 20 मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले येथील स्टेडियमवर खेळवले जातील. याशिवाय, वनडे मालिकेचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. आता वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. दुसरा सामना 4 ऑगस्ट तर तिसरा सामना 7 ऑगस्टला होणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी लवकरच संघ निवड करण्यात येणार आहे.









