केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून एनओसी देण्याबाबत सुधारणा : औद्योगिक क्षेत्रांना पाणी वापरास परवानगी
बेळगाव : भूजल संवर्धनाबाबत केंद्रीय भूजल प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जलशक्ती मंत्रालयाने 2020 आणि 2023 साठी भूजल व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन तत्त्वे जारी केली होती. यामध्ये व्यावसायिक, औद्योगिक, पायाभूत सुविधा, खाणकाम, टँकर पाणीपुरवठा आणि इतर कारणांसाठी भूजल वापरण्यासाठी एनओसी देण्याबाबत काही बदल करण्यात आले आहेत. थीम पार्क, वॉटर पार्क, मनोरंजन पार्कला भूजल वापरण्यासाठी एनओसी मिळणार नाही. राज्यातील भूजलचा अतिवापर करणारे तालुके असलेल्या जिल्ह्यांमध्ये बहुतेक उद्योग कार्यरत आहेत.
मात्र हे उद्योग तेथे स्थापन करण्यात आले आहेत, जेथे भूजल उपलब्धता कमी आहे. अशा उद्योगांना भूजल वापराची परवानगी देण्यात आलेली आहे. जर परवानगी नाकारल्यास औद्योगिक विकासाला अडथळा निर्माण होईल, यादृष्टीने भूजल वापरास उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागात घरगुती भूजल वापर, ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्प, कृषी उपक्रम, लघु व सुक्ष्म उद्योग, निवासी अपार्टमेंट आणि गृहनिर्माण संस्थांना सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एनओसी मिळविण्यापासून सूट देण्यात आली आहे. खाणकाम, उद्योग व पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भूजलासाठी एनओसीमध्ये दिलेल्या तरतुदींमध्ये भूजल पुनर्भरण संरचना तयार केल्यास किंवा पुनर्संचयीत शुल्कावर 50 टक्के सूट देण्याच्या तरतुदीतून सूट देण्यात आली आहे.
कायद्यांतर्गत एनओसी आधीच लागू
या कायद्यांतर्गत एनओसी आधीच लागू केली जात असून, संबंधित विभागाच्या कार्यालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार एनओसी देण्यापासून वसूल होणारे शुल्क भूजल, पुनर्भरणा कार्यक्रमाच्या खर्चासाठी वापरणे आवश्यक आहे. अतिवापर झालेल्या आणि अतिवार नसलेल्या या दोन्ही क्षेत्रांमध्ये भूजल वापरासाठी शुल्क निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार केंद्र सरकारने शुल्क वसूल करण्यास मान्यता दिली आहे.
पायाभूत सुविधांसाठी एनओसी बंधनकारक
केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यमान आणि नूतन खाण प्रकल्पांसाठी भूजल वापरण्यासाठी एनओसी अनिवार्य आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि प्रक्रिया केलेले पाणी थेट जलसाठ्यांमध्ये सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवासी अपार्टमेंट व गृहनिर्माण संस्थांना 20 केएलडीपर्यंत भूजल वापरण्यास सूट देण्यात आली आहे. नवीन पॅकेजेस अंतर्गत उद्योगांना औद्योगिक विस्तार किंवा पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी भूजल वापरास परवानगी देण्यात आली आहे. सर्व नूतन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एनओसी घेणे बंधनकारक असून थीम पार्क, वॉटर पार्क, मनोरंज पार्क आदींना भूजल वापरास एनओसी मिळणार नाही.
अटींचे पालन न केल्यास दंड अन् कारावासही
जर एनओसी जारी करणाऱ्या संस्थांनी एनओसीमधील अटींचे पालन केले नसल्यास 10 हजाराचा दंड व 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भूजल समितीच्या विद्यमान सदस्यांना व्यावसायिक, औद्योगिक, मनोरंजनात्मक आणि खाण पायाभूत सुविधा अंतर्गत भूजलाचा बेकायदेशीरपणे वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच भूजलाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्याचेही अधिकार समिती सदस्यांना देण्यात आले आहेत.









