सुरुवातीला द्यावी लागेल ‘सीईई’ ः सामायिक प्रवेश परीक्षेनंतर दोन प्रकारच्या चाचण्या
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लष्कराने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. सैन्यात सामील होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रथम नियुक्त केंद्रांवर ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल, त्यानंतर भरती रॅलीदरम्यान शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या आणि नंतर सैन्यात निवड होण्यापूर्वी वैद्यकीय चाचण्या केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. लष्कराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत दलातील सैनिकांच्या भरतीसाठी तीन टप्प्यांचा तपशील देण्यात आला आहे.
यापूर्वी अग्निवीरांची भरती प्रक्रिया वेगळय़ा पद्धतीने होत होती. सुरुवातीच्या प्रक्रियेनुसार अग्निवीर उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागत होती. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होत होती. शेवटचा टप्पा म्हणून उमेदवारांना सीईई परीक्षा घेतली जात होती. आतापर्यंत 19 हजार अग्निवीर सैन्यात दाखल झाले असून मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून आणखी 21 हजार अग्निवीर सैन्यात दाखल होतील. सदर नवीन भरती नियम 2023-24 च्या पुढील भरती चक्रापासून सैन्यात सामील होण्यास इच्छुक उमेदवारांना लागू होतील.
पूर्वीच्या भरती रॅलींमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांची संख्या लहान शहरांमध्ये 5,000 पासून मोठय़ा शहरांमध्ये 1.5 लाखांपर्यंत होती. भरती रॅलीसाठी हजारो उमेदवारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा मोठा प्रशासकीय खर्च आणि प्राथमिक उपाययोजना लक्षात घेऊन भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
पूर्वीच्या प्रक्रियेत मोठय़ा संख्येने उमेदवारांची वैद्यकीय व शारीरिक तंदुरुस्ती तपासणी करणे समाविष्ट असल्यामुळे प्रशासकीय संसाधनांवर ताण पडत होता. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मोठय़ा संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करावे लागत होते. तसेच भरती प्रक्रियेवेळी मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी तैनात करावे लागत होते. आता नवीन भरती प्रक्रियेमुळे रॅली आयोजित करण्यासाठी लागणारा खर्च मोठय़ा प्रमाणात कमी होईल आणि प्रशासकीय तसेच लॉजिस्टिक भार कमी होईल, असा दावा केला जात आहे.
आधुनिकीकरणावर भर देऊन आणि भविष्यात सुरक्षा दलात विशिष्ट तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची योजना असलेल्या सैन्यात शैक्षणिकदृष्टय़ा मजबूत सैनिकांचा समूह असणे योग्य आहे. त्यादृष्टीने ‘सीईई’ पात्रता ही पहिली छाननी टप्पा असणारी नवीन प्रक्रिया अधिक चांगल्या पात्र उमेदवारांची खात्री करेल, असे अन्य एका अधिकाऱयाने सांगितले. याशिवाय शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय चाचणी यातही अधिक काळजीपूर्वक लक्ष देता येणार असल्याचे सांगण्यात आले.
काय आहे अग्निपथ योजना?
केंद्र सरकारने सैन्यात भरती होण्यासाठी अग्निवीर योजना लागू केली आहे. या योजनेनुसार, 17.5 ते 23 वर्षे वयोगटातील तरुणांना 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. यासाठी जवानांना वेगवेगळय़ा पॅकेजमध्ये वेतन दिले जाणार आहे. मात्र, ही योजना लागू झाल्यानंतर देशभरात तरुणांकडून मोठय़ा प्रमाणात हिंसक निदर्शने झाली. बिहारसह सर्व हिंदी राज्यांमध्ये अग्निवीर योजनेच्या विरोधात निदर्शने झाली. बिहारमध्येही गाडय़ा जाळण्यात आल्या. याशिवाय देशातील बहुतांश राज्यांतून या योजनेला विरोध झाला होता. मात्र, यानंतर सरकारने योजना योग्यपणे राबविण्याची हमी देण्याबरोबरच त्याचे लाभ जाहीर केल्यामुळे विरोध पूर्णपणे मावळला आहे. आता या योजनेंतर्गत भरती प्रक्रियेसाठी हजारो तरुण गर्दी करताना दिसत आहेत.
सुधारित बदलानुसार…
पहिला टप्पा ः ऑनलाईन सामान्य प्रवेश परीक्षा (सीईई) घेतली जाईल.
दुसरा टप्पा ः लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल.
तिसरा टप्पा ः तिसऱया टप्प्यात पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.
(या तीन टप्प्यांत उत्तीर्ण होणाऱया उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर, सेवानिश्चितीनुसार कागदपत्रे सादर करून उमेदवारांना प्रशिक्षण केंद्रावर रितसर अहवाल द्यावा लागेल.)









