बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बिल्डींग बायलॉजमध्ये बदल करण्यात आला असून आता तीन मजली इमारत बांधण्यालाही रितसर परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवीन घरकूल बांधण्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांचा अडसर दूर झाला आहे. बिल्डींग बायलॉज 2025 बाबत मंगळवारी कॅन्टोन्मेंट सभागृहात पार पडलेल्या मासिक बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी होते. त्याचबरोबर सीईओ राजीवकुमार, आमदार आसिफ सेठ, सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर व अधिकारी उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांना नवीन घर बांधण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून परवानगी दिली जात नव्हती. बिल्डींग बायलॉज 1984 ची अंमलबजावणी केली जात होती. मात्र आता या बायलॉजमध्ये बदल करण्यात आला असून बिल्डींग बायलॉजची अंमलबजावणी यापुढे केली जाणार आहे. याची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून बाजार परिसर, बंगलो एरिया (किल्ल्याच्या आतील), किल्ला बाहेरील परिसर (आऊटर फोर्ट) अशी विभागणी करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्या झोनमधील बाजार परिसरात एखाद्या इमारतीचे बांधकाम करायचे असल्यास पहिल्या टप्प्यात एक टक्का भागात बांधकाम करावे लागत होते. मात्र नवीन
बायलॉजनुसार 2.5 भागात बांधकाम करता येणार आहे. त्याचप्रमाणे तीन मजली इमारत बांधता येणार असून त्याला कॅन्टोन्मेंटकडून रितसर परवानगीही दिली जाणार आहे. मात्र नियोजित इमारतीच्या प्लॅनला कॅन्टोन्मेंटकडून परवानगी घेण्यासह एनओसीदेखील घ्यावी लागणार आहे. झोन क्र. 2 मधील किल्ल्याच्या आतील बंगलोसाठी यापूर्वी 0.5 भागात बांधकाम करता येत होते. मात्र यापुढे 1 भागात बांधकाम करता येणार आहे. याचा लाभ लीज प्रॉपर्टीधारक आणि फ्री होल्डर्सना होणार आहे. तर जुन्या इमारतींना याचा फायदा होणार नसल्याचे सांगण्यात आले. झोन क्र. 3 मधील किल्ल्याबाहेरील इमारती यापूर्वी 0.5 भागात बांधल्या जात होत्या. मात्र आता 3 भागात बांधकाम करता येऊ शकणार आहे. याठिकाणी तळमजल्यासह तीन मजली इमारत बांधण्यास परवानगी देण्यात येणार आहे. देशातील इतर कॅन्टोन्मेंट बोर्डांकडून बिल्डींग बायलॉज 2025 वर चर्चा करून अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीतदेखील नवीन बायलॉजबाबत चर्चा करून अहवाल पाठविण्यात आला.
जाहिरात ठेकेदारांचा काळ्यायादीत समावेश…
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत जाहिरातींचा ठेका घेऊन कॅन्टोन्मेंटला शुल्क न भरलेल्या दोघा ठेकेदारांची काळ्यायादीत नोंद करण्यात आली आहे. फॅब मीडिया वर्क आणि ए वन आर्ट अशी त्यांची नावे आहेत. फॅब मीडिया वर्क ठेकेदाराकडून साडेचार लाख तर ए वन आर्ट ठेकेदाराकडून 2 लाख 71 हजार रुपयांचे शुल्क भरणे बाकी आहे. त्यामुळे दोघांनाही काळ्यायादीत घालण्यात आले आहे.









