ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रांची विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात चढण्यापासून एका दिव्यांग व्यक्तीला रोखण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. त्यानंतर या कंपनीवर टीकेची झोड उठली. इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही दिव्यांग मुलाला प्रवेश नाकारल्याचे इंडिगो एअरलाईन्सने स्पष्टीकरण दिले. मात्र, DGCA ने हा प्रकार गांभीर्याने घेत इंडिगो एअरलाईन्सवर दंडात्मक कारवाई केली. तसेच विमान प्रवासाबाबतच्या नियमावलीतही बदल केले. ज्यामुळे अशा प्रवाशांची आता अडवणूक होणार नाही.
काय आहे नवी नियमावली?
एखादी व्यक्ती विमानाने प्रवास करण्यासाठी शारीरिकदृष्टय़ा फिट आहे की नाही, याचा निर्णय पूर्णतः डॉक्टरांच्या तपासणीवर अवलंबून असणार आहे. विमान कंपन्यांना प्रवाशाच्या प्रवास करण्याच्या क्षमतेविषयी शंका आल्यास किंवा अशा प्रवाशाला विमान प्रवासापासून रोखायचे असेल तर त्या व्यक्तीची डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे बंधनकारक असणार आहे. डॉक्टरांनी प्रवाशी प्रवास करण्यास सक्षम नसेल असा अहवाल दिला तरच विमान कंपन्या अशा प्रवाशांना प्रवासापासून रोखू शकतात. अन्यथा सर्वांना विमानात प्रवेश देणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे विमान कंपन्या आता प्रवाशांची अडवणूक करू शकणार नाहीत.
काय घडला होता प्रकार?
रांची विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सने एका दिव्यांग मुलाला विमानात प्रवेश नाकारला होता. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन त्याला प्रवेश नाकारल्याचे कंपनीने सांगितले. मात्र, प्रत्यक्षात हा मुलगा घाबरला होता. विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनामुळे त्याच्या मनावर परिणाम झाल्याचे मुलाच्या आईने म्हटले होते. त्यानंतर मुलाच्या आईने यासंदर्भात DGCA कडे तक्रार दाखल केली. DGCA ने या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ इंडिगो एअरलाईन्सवर कारवाई करत 5 लाखांचा दंड ठोठावला. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये, म्हणून विमान प्रवासाच्या नियमावलीत बदल केले.









