रहिवाशांची महानगरपालिकेकडे मागणी : उपमहापौरांना दिले निवेदन
बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस येथील जलवाहिनी अत्यंत जुनी असून तिचा आकारही कमी आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. परिणामी रहिवाशांना व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे येथील जलवाहिनी बदलून नवीन मोठी जलवाहिनी घालण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आनंदनगर दुसरा क्रॉस रहिवाशांच्यावतीने गुरुवारी उपमहापौर वाणी जोशी यांची भेट घेऊन देण्यात आले.
आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे घालण्यात आलेली जलवाहिनी अत्यंत जुनी आहे. सध्याची जलवाहिनी अडीच इंची असून परिसराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. व्यवस्थितरित्या पाणी मिळत नसल्याने रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाणीसमस्या अधिक जाणवत असल्याने जुनी जलवाहिनी बदलून चार इंची पाईपलाईन घालण्यात यावी, त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही. अधिक दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या गंभीर समस्येकडे महापालिकेने लक्ष घालून तातडीने जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी रहिवाशांच्यावतीने करण्यात आली. निवेदनाचा स्वीकार करून उपमहापौर वाणी जोशी म्हणाल्या, नुकतीच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअँडटी कंपनीसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र सदर बैठक 3 एप्रिल रोजी होणार असल्याने त्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना सूचना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रतिमा संतोष पवार, रोहिणी जुवेकर, संतोष पवार आदी उपस्थित होते.









